World Athletics Championships: भारतीय खेळाडूंचा डंका! नीरज चोप्रा पाठोपाठ रोहित यादवनेही गाठली अंतिम फेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 10:51 AM2022-07-22T10:51:17+5:302022-07-22T10:54:58+5:30
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा विजयी डंका अद्याप सुरूच आहे.
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) विजयी डंका अद्याप सुरूच आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर ८ महिन्यानंतर पुन्हा एकदा नीरजने मैदान गाजवलं आहे. याशिवाय ट्रिपल जंपमध्ये भारताच्या एलडहोस पॉलने (Eldhose Paul 16.68M) इतिहास रचून सर्वांचे लक्ष वेधले असून तो तिहेरी उडीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. नीरज चोप्राशिवाय आणखी एक भारतीय खेळाडू रोहित यादवने देखील ८०.४२ मीटर भाला फेकून फायनलचे तिकिट मिळवलं आहे.
१९ वर्षांचा संपणार दुष्काळ?
दरम्यान, पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनेही फायनलसाठी क्वालिफाय केले आहे. दोन भारतीय खेळाडू जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुष भालाफेकच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वच भारतीयांना नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा असणार आहे. कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावणारा नीरज चोप्रा आणखी एक सुवर्ण पदक पटकावणार का हे पाहण्याजोगं असेल. रविवारी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा १९ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी नीरज चोप्राकडे असणार आहे.
As the commentator predicted, "he wants one & done" #NeerajChopra does it pretty quickly & with ease before admin's laptop could wake up 🤣
— Athletics Federation of India (@afiindia) July 22, 2022
With 88.39m, Olympic Champion from 🇮🇳 #India enters his first #WorldAthleticsChamps final in some style 🫡 at #Oregon2022pic.twitter.com/y4Ez0Mllw6
एकाच 'थ्रो'ने दिलं फायनलचं तिकिट
फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ८३.५० मीटरची पात्रता ठेवण्यात आली होती. नीरज ग्रुपचा हिस्सा होता आणि सर्वप्रथम तो थ्रो करण्यासाठी आला. विशेष म्हणजे आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्याने ८८.३९ मीटर लांबीवर भाला फेकून फायनलमध्ये प्रवेश केला. हा त्याचा या वर्षातील तिसरा सर्वश्रेष्ठ थ्रो आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणखी एक विश्वविक्रम करण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. आपल्या पहिल्याच थ्रोमध्ये क्वालिफाय करणाऱ्या चोप्राने सहज अंतिम फेरी गाठली.
एलडहोस पॉलने रचला इतिहास
नीरज चोप्राच्या आर्मीमध्ये आणखी एका भारताचा खेळाडूचा समावेश झाला आहे. भारताचा स्टार ट्रिपल जंपर एलडहोस पॉलने देखील या चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी क्वालिफाय केले आहे. १६.६८ मीटरचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत त्याने फायनलमध्ये प्रवेश मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे त्याला १७.०५ ची पात्रता गाठण्यात अपयश आलं मात्र टॉप १२ मध्ये असल्यामुळे त्याला अंतिम फेरीत स्थान मिळाले.