"मीही पद्मश्री परत करतो", वीरेंद्र सिंहचा कुस्तीपटूंना पाठिंबा, सचिनसह नीरज चोप्रालाही केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 05:01 PM2023-12-23T17:01:03+5:302023-12-23T17:01:45+5:30
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली अन् संजय सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली अन् संजय सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर वादाला तोंड फुटले आहे. निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह (WFI Chief Sanjay Singh) यांच्या विजयानंतर काही कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकला आहे. तर बजरंग पुनियाने आपला पद्म पुरस्कार परत केला आहे. अशातच पैलवान वीरेंद्र सिंहने देखील आक्रमक पवित्रा घेत पद्म पुरस्कार माघारी करणार असल्याची घोषणा केली.
साक्षी मलिकच्या कुस्ती सोडण्याच्या निर्णयाचे वीरेंद्र सिंहने समर्थन केले असून पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले. खरं तर माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांचा सहकारी कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे दुखावलेली कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. साक्षी आणि इतर खेळाडूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
पद्मश्री परत करणार - वीरेंद्र सिंह
आता पैलवानांच्या समर्थनार्थ वीरेंद्र सिंहने आवाज उठवला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "मी माझी बहीण आणि देशाच्या लेकीसाठी पद्मश्री देखील परत करीन. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, मला तुमच्या मुलीचा आणि माझी बहीण साक्षी मलिकचा अभिमान आहे. पण मी देशातील आघाडीच्या खेळाडूंनाही आवाहन करेन की, त्यांनी देखील त्यांचा निर्णय घ्यावा." सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांना टॅग करत वीरेंद्र सिंहने ही माहिती दिली. कुस्तीपटू बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पद्मश्री परत करण्यासाठी पत्र लिहल्यानंतर वीरेंद्र सिंहने ही पोस्ट केली.
मैं भी अपनी बहन और देश की बेटी के लिए पदम् श्री लौटा दूँगा, माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को, मुझे गर्व है आपकी बेटी और अपनी बहन @SakshiMalik पर... जी क्यों...?
— Virender Singh (@GoongaPahalwan) December 22, 2023
पर देश के सबसे उच्च खिलाड़ियों से भी अनुरोध करूँगा वो भी अपना निर्णय दे...@sachin_rt@Neeraj_chopra1pic.twitter.com/MfVeYdqnkL
पैलवानांच्या आक्रमक पवित्र्यानंतर ब्रीजभूषण शरण सिंह यांनी म्हटले, "काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या या कुस्तीपटूंसोबत देशातील एकही कुस्तीपटू नाही. ते विरोध करत आहेत, त्यांच्या विरोधामुळे मी आता फाशी घेऊ का? गेले ११ महिने आणि तीन दिवस चाललेल्या ग्रहणाचा फटका कुस्तीला बसला होता. आता निवडणुका झाल्या आणि जुन्या महासंघाचा पाठिंबा असलेला उमेदवार म्हणजेच आमचे समर्थक उमेदवार संजय सिंह उर्फ बबलू विजयी झाले. विजय सुद्धा ४० ते ७ अशा फरकाने झाला. आता आमचे ध्येय कुस्तीचे काम पुढे नेण्याचे आहे."