Pele Passes Away: दिग्गज फुटबॉलपटू पेले कालवश; कर्करोगाशी झुंज अखेर संपली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 07:44 AM2022-12-30T07:44:52+5:302022-12-30T07:45:13+5:30
ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
विक्रमी तीन विश्वचषक जिंकणारे ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. शतकातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले २०२१ पासून कोनल कॅन्सरवर उपचार घेत होते. काही आजारांमुळे ते गेल्या महिन्यापासून रुग्णालयात दाखल होते. त्यांचे एजंट जोए फ्रॅगा यांनी पेले यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पेले यांनी ब्राझीलला फुटबॉलच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. साओ पाउलोपासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रवासात ते या खेळाचे ग्लोबल एम्बेसेडरही बनले. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने १९५८, १९६२ आणि १९७० मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यांनी ब्राझीलकडून ७७ गोल केले. नुकतेच विश्वचषकादरम्यान नेमारने त्यांच्या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली होती.
पेले यांचं पूर्ण नाव काय?
पेले यांचे पूर्ण नाव एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो होते. त्यांचा जन्म १९४० मध्ये झाला. फुटबॉलची लोकप्रियता शिखरावर नेण्यात आणि त्यासाठी मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात ते एक अग्रणी होते. भ्रष्टाचार, लष्करी उठाव, सेन्सॉरशिप आणि दडपशाही सरकारांनी वेढलेल्या देशात त्यांचा जन्म झाला. वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजेच १९५८ मध्ये त्यांनी विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलची प्रतिमा बदलली.
अशा प्रकारे आले चर्चेत
स्वीडनमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत पेले यांनी चार सामन्यांत सहा गोल केले, त्यापैकी दोन अंतिम सामन्यात झाले. ब्राझीलला त्यांनी यजमान संघावर 5-2 ने विजय मिळवून दिला आणि इथूनच त्यांचा चढता आलेख सुरू झाला. FIFA ने महान खेळाडूंपैकी एक म्हणून सूचीबद्ध केलेले पेले हे राजकारण्यांचे देखील आवडते होते. १९७० च्या विश्वचषकापूर्वी ते ब्राझीलच्या सर्वात हुकूमशाही सरकारच्या सर्वात निर्दयी सदस्यांपैकी एक असलेले ब्राझीलचे अध्यक्ष एमिलियो गारास्ताझू मेडिसी यांच्यासोबत स्टेजवर दिसले होते.