माजी कर्णधार अंकित केशरीचा मृत्यू
By admin | Published: April 21, 2015 12:39 AM2015-04-21T00:39:51+5:302015-04-21T00:39:51+5:30
गेल्या नोव्हेंबर महिन्यात फिलिप ह्युजच्या मृत्यूनंतर क्रिकेट मैदानावर आणखी एक दु:खद घटना घडली. १७ एप्रिल रोजी बंगाल क्रिकेट संघटनेच्या वन-डे बाद फेरीच्या
कोलकाता : गेल्या नोव्हेंबर महिन्यात फिलिप ह्युजच्या मृत्यूनंतर क्रिकेट मैदानावर आणखी एक दु:खद घटना घडली. १७ एप्रिल रोजी बंगाल क्रिकेट संघटनेच्या वन-डे बाद फेरीच्या सामन्यादरम्यान दुखापग्रस्त झालेला बंगालचा एक प्रतिभावान फलंदाज अंकित केशरी याचा सोमवारी रुग्णालयात मृत्यू झाला.
केशरी तीन दिवसांपासून रुग्णालयात होता. रविवारी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर त्याला भोजन देण्यात आले. आज
पहाटेला त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर त्याचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले.
उजव्या हाताने खेळणाऱ्या या प्रतिभावान फलंदाजाने कुचबिहार करंडक स्पर्धेत बंगालच्या अंडर १९ संघाचे कर्णधारपद भूषविले होते. २०१४च्या ज्युनिअर विश्वकप स्पर्धेत भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या २० सदस्यांच्या संघात त्याचा समावेश होता. याव्यतिरिक्त केशरी सी. के. नायडू राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये बंगालच्या २३ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करीत होता. त्याचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश नव्हता; पण १२वा खेळाडू म्हणून तो मैदानात होता. रेल्वेचा रणजीपटू अष्टपैलू अर्णब नंदीच्या स्थानी तो मैदानात उतरला होता. ही घटना सॉल्ट लेक मैदानावर ईस्ट बंगाल व भवानीपूर क्लब संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या वन-डे लढतीदरम्यान घडली.
शिव सागरने त्याला मुखावाटे सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने श्वास घेतला. त्याला नाईटिंगल नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले.
मुखर्जीने सांगितले की, त्याला काही बाह्य इजा झाली नव्हती; पण तो बेशुद्ध झाला होता. अनुस्तूप मुजुमदार व शिवसागर सिंग यांनी त्याच्याकडे धाव घेतली व त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. तो शुद्धीवर येत असताना त्याला उपचारासाठी जवळच्या एएमआरआयमध्ये नेण्यात आले. तेथून त्याला नाईटिंगल रुग्णालयात हलवण्यात आले.’
कॅबचे संयुक्त सचिव सुबीर गांगुली म्हणाले, ‘मी यावर भाष्य करण्याच्या स्थितीत नाही. मला दु:ख झाले असून, त्याच्या आई-वडिलांची काय स्थिती असेल, याची कल्पना करणे शक्य नाही. त्याचे पार्थिव आज ईस्ट बंगाल टेंटमध्ये आणण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम संस्कारसाठी नेण्यात येईल.’
गांगुली आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाणार होते; पण ते कोलकाता विमानतळावरून माघारी परतले. गांगुली म्हणाले, ‘कुठल्या बैठकीमध्ये सहभागी होण्याची सध्या माझी मन:स्थिती नाही.’
भारत ‘अ’ संघाचा कर्णधार मनोज तिवारी म्हणाला, ‘तो एक प्रतिभावान युवा फलंदाज होता. आगामी एक-दोन वर्षांत तो रणजी स्पर्धेत खेळू शकला असता. त्याला सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याचे कळले. स्कॅन करण्यात आल्यानंतर अंतर्गत रक्तस्राव झाला नसल्याचे स्पष्ट झाले होते.’
(वृत्तसंस्था)