प्रेरणादायी! 'मोटरस्पोर्ट्स'साठी टेनिसपटूचं 'धाडस', तरूणाईसाठी उभारलं हक्काचं व्यासपीठ
By ओमकार संकपाळ | Published: July 2, 2024 12:53 PM2024-07-02T12:53:12+5:302024-07-02T12:58:41+5:30
ईशान लोखंडे यांनी इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगची स्थापना करून तरूणाईसाठी एक व्यासपीठ तयार केले आहे.
भारतात बहुतांश खेळ असे आहेत, जे तरूणांना, त्यांच्या धाडसाला आमंत्रण देत असतात. तसे पाहिल्यास तमाम भारतीयांनी इतर खेळांकडे दुर्लक्ष करताना क्रिकेटला भरभरून प्रेम दिले. अलीकडेच भारताच्या क्रिकेट संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला आणि देशभर जल्लोष सुरू झाला. विशेष बाब म्हणजे भारतात क्रिकेटची असलेली प्रसिद्धी अनेक नामांकित खेळांना आणि त्या खेळातील खेळाडूंना पडद्यामागे टाकते यात शंका नाही. कबड्डी, फुटबॉलप्रमाणे 'मोटरस्पोर्ट्स' हा देखील एक धाडसी खेळ म्हणावा लागेल. 'दिसतं तसं काही नसतं' याचा प्रत्यय या खेळातून नक्कीच येतो. याच खेळाला नवीन व्यासपीठ मिळावे यासाठी पुण्यात CEAT इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने (ISRL) एक नवीन अध्याय सुरू केला आहे. ISRL चा प्रवास खूप खडतर असून, यंदा दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले जात आहे. लीगच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे संचालक आणि सह-संस्थापक ईशान लोखंडे यांनी 'लोकमत'शी बोलताना विविध बाबींवर प्रकाश टाकला. उद्घाटनाच्या हंगामात प्रेक्षकांनी मोठी गर्दी करून धाडसी शिलेदारांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. पुणे, अहमदाबाद आणि बंगळुरू येथे पहिला हंगाम पार पडला.
ईशान लोखंडे हे स्वतः एक टेनिसपटू होते आणि त्यांना या खेळाने आकर्षित केले... या खेळात त्यांनी स्वतः ला झोकून दिले, परदेशात जाऊन याचे प्रशिक्षण घेतले. अनेक स्पर्धामध्ये सहभाग घेतला. १०-१२ वर्षांच्या अनुभवानंतर या खेळात युवा पिढीने कारकीर्द घडवावी आणि त्यासाठी त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावे यासाठी त्यांनी इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग आणली. हा प्रवास इथवर ना थांबवता पुढील पिढी घडविण्यासाठी अकादमी काढण्याचा त्यांचा विचार आहे. हा खेळ केवळ मुलांकरिता नसून यात ११ वर्षांच्या दोन मुलीही उत्तम कामगिरी करत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात या मुली मुलांनाही टक्कर देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ISRL चे संस्थापक ईशान लोखंडे यांची या खेळासाठी झटण्याची असलेली जिद्द नक्कीच प्रेरणादायी आहे.
ISRL ने दिले नवे व्यासपीठ
मोटरस्पोर्ट्स हा खेळ सर्वात धाडसी असून, याकडे तरूणाईला आकर्षित करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन ईशान लोखंडे यांनी केले. ते म्हणाले की, आपल्या देशात अनेक असे स्टार रायडर्स आहेत. पण, या खेळाला तितकीशी प्रसिद्धी नसल्याने किंबहुना याचा प्रचार नसल्याने ते पडद्यामागे जातात. अशाच काही खेळाडूंना आणि नवीन तरूण-तरूणींना या क्षेत्रात करिअर करता यावे, स्वत:ची प्रतिभा सिद्ध करता यावी यासाठी आम्ही एक व्यासपीठ तयार केले आहे. इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे आयोजन करताना आम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. हा प्रवास शब्दांत मांडणे कठीणच.
तसेच मोटरस्पोर्ट्स हा दिसतो तितका सोपा खेळ नाही याचा प्रत्यय बाईकवर बसल्यावरच येतो. अथक परिश्रम, कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यामाध्यमातून यशाचे शिखर गाठता येते. मात्र, त्यासाठी खूप संघर्ष हा आहेच. अनेक खेळाडूंसाठी दहा-दहा वर्षांनंतर यशाचे दार उघडले आहे. त्यामुळे सातत्य हीच विजयाची पहिली पायरी आहे, असेही लोखंडे यांनी सांगितले.
CEAT इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगची (ISRL) स्थापना वीर पटेल, ईशान लोखंडे आणि अश्विन लोखंडे यांनी केली. यामाध्यमातून त्यांनी तरूणाईला या खेळाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या खेळात करिअर घडवू इच्छित असलेल्यांसाठी पुण्यात एक नवीन अध्याय सुरू केल्याचे दिसते.
ISRL ची रणनीती
इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने त्यांच्या पुढील प्रवासाबद्दल भाष्य केले. ISRL विस्तारासाठी सज्ज आहे. आगामी काळात भारतातील ३३ शहरांमध्ये या लीगचे आयोजन करण्याचे लक्ष्य आहे. दुसऱ्या हंगामातून अधिकाधिक संघांना मोठ्या व्यासपीठावर कशी संधी मिळेल यासाठी लीग प्रयत्नशील असेल. आर्थिक यशापलीकडे देखील यश आहे आणि भारताला सुपरक्रॉसचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे लोखंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुण्यात पदार्पणाच्या हंगामात अंदाजे ९ हजार प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवून स्पर्धेची शोभा वाढवली. बंगळुरूमधील ग्रँड फिनालेने जवळपास ८ हजार प्रेक्षकांना भुरळ घातली. एका हंगामात ३०,००० प्रेक्षकांची उपस्थिती हा परक्रॉस इव्हेंटसाठी एक नवीन जागतिक विक्रम आहे. या हंगामात जॉर्डी टिक्सियर, मॅट मॉस आणि अँथनी रेनार्ड यांसारख्या दिग्गजांसह जगातील ४८ उत्कृष्ट रायडर्सचा सहभाग होता. BigRock Motorsports च्या संघाने बाजी मारून स्पर्धेचा शेवट केला.
ईशान लोखंडे : संचालक आणि सह-संस्थापक - इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग