माजी विश्वविजेत्या चेकाचे विजेंदरला चॅलेंज
By Admin | Published: November 15, 2016 01:12 AM2016-11-15T01:12:27+5:302016-11-15T01:12:27+5:30
सलग ७ विजयांसह आपल्या व्यावसायिक बॉक्सिंगची धडाक्यात सुरुवात करणारा भारताचा स्टार खेळाडू विजेंदरला आता तगडे आव्हान मिळाले आहे.
नवी दिल्ली : सलग ७ विजयांसह आपल्या व्यावसायिक बॉक्सिंगची धडाक्यात सुरुवात करणारा भारताचा स्टार खेळाडू विजेंदरला आता तगडे आव्हान मिळाले आहे. माजी विश्वविजेता असलेल्या फ्रान्सिस चेकाने दिलेल्या चॅलेंजमुळे आता विजेंदरला काही महिन्यापूर्वीच पटकावलेल्या सुपर मिडलवेट आशिया - पॅसिफिक किताबाचा बचाव करायचा आहे. येत्या १७ डिसेंबरला दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये होणाऱ्या या लढतीसाठी विजेंदरने कंबर कसली आहे.
विद्यमान आंतरमहाद्वीप चॅम्पियन असलेल्या टांझानियाच्या चेकाकडे ४३ सामन्यांच्या अनुभव असून त्याने १७ नॉकआऊटसह ३२ विजय मिळवले आहेत. त्याच्याकडे सुपर मिडलवेट गटातील दिग्गजांविरुद्ध लढण्याचा अनुभव आहे. तसेच चेकाने आपल्या १६ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ३०० राऊंडच्या लढती लढल्या आहेत.
तर, आतापर्यंत अपराजित असलेल्या विजेंदरने सलग ७ लढती जिंकताना संपूर्ण बॉक्सिंग विश्वाचे लक्ष वेधले आहे. तसेच विजेंदरकडे केवळ २७ राऊंडच्या लढतींचा अनुभव आहे. मात्र तरीही, ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत आपली चमक दाखवली आहे, त्याकडे पाहता बॉक्सिंगप्रेमींना ही लढत एकतर्फी नक्कीच होणार नसल्याची पुरेपूर खात्री आहे.
चेकाने विजेंदरला आव्हान देताना म्हटले आहे, की ‘मी या मुलाबद्दल खूप काही ऐकले आहे. त्याला बॉक्सिंगचे धडे द्यायला मी सज्ज आहे. मी भारतात येणार आहे. मी त्याला त्याच्याच घरामध्ये नमवण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. त्याला त्याच्या घरीच नमवून किताब पटकावणे शानदार ठरेल.’ (वृत्तसंस्था)