दिग्गज मेरीकोमसह चार भारतीय बॉक्सर्स उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:15 AM2018-11-19T02:15:35+5:302018-11-19T02:16:22+5:30
पाचवेळची वर्ल्ड चॅम्पियन दिग्गज एम. सी. मेरीकोमसह (४८ किलो) भारताच्या चार बॉर्क्सर्सनी रविवारी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.
नवी दिल्ली : पाचवेळची वर्ल्ड चॅम्पियन दिग्गज एम. सी. मेरीकोमसह (४८ किलो) भारताच्या चार बॉर्क्सर्सनी रविवारी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. परंतु दुसरीकडे एल. सरिता देवी (६० किलो) हिला मात्र पराभव स्वीकारावा लागला. मेरीकोमने कझाखस्तानच्या एसरिम कासेनायेव्हाचा ५-० ने पराभव केला. त्याचवेळी, युवा मनीषा मौनने स्पर्धेतील सर्वात लक्षवेधी विजय मिळवताना जागतिक विजेती डिना जोलामॅनला पराभवाचा धक्का देत खेळबळ माजवली.
विश्व चॅम्पियनशिपमध्ये पाच सुवर्णांसह एकूण सहा पदके जिंकणाऱ्या मेरीकोमने रविवारी केडी जाधव स्टेडियममध्ये आपल्या अनुभवाच्या जोरावर कजाखस्तानच्या दिग्गज प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी मेरीकोमला मंगळवारी चीनच्या वु यूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. वु यूने फिलिपिन्सच्या जोसी गाबुकोचा पराभव केला.
गेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये सरिताने येथे सुवर्णपदक पटकावले होते. ती पुन्हा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील होती, पण आयर्लंडची २०१६ च्या विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेती एने कॅली हॅरिंग्टनविरुद्ध तिला २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यात रेफरीने सरिता पडल्यानंतर काऊंटिंग सुरू केली होती. सरिता निकालावर नाराज होती.
याव्यतिरिक्त भारताची युवा बॉक्सर मनिषा मोन (५४ किलो), लवलिना बोरगोहेन (६९ किलो) आणि भाग्यवती काचरी (८१ किलो) यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताचे आठ खेळाडू आतापर्यंत रिंगमध्ये उतरले असून सरिता देवीचा अपवाद वगळता सर्वांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
दुपारच्या सत्रात युवा मनीषाने विद्यमान विश्व चॅम्पियन कजाखस्तानच्या डिना जोलामॅनचा ५-० ने पराभव केला. यापूर्वीच्या फेरीत अमेरिकेच्या अनुभवी क्रिस्टिना क्रूजचा पराभव करणाºया मनीषाने यापूर्वी पोलंडमध्ये डिनाचा पराभव केलेला होता. आता पदकाच्या शर्यतीत येण्यासाठी मनीषाला मंगळवारी अव्वल मानांकित व २०१६ च्या विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेती स्टोयका पेट्रोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
मनीषाने आपल्या उंचीचा लाभ घेतला. तिने प्रतिस्पर्ध्यापासून अंतर राखून खेळताना डाव्या व उजव्या हाताने पंच लगावण्याची रणनीती कायम राखली. पाच परीक्षकांनी मनीषाला ३०-२७, २०-२७, २०-२७, २९-२८, २९-२८ असे गुण दिले.
दिवसाच्या दुसºया लढतीत लवलिनाने पनामाच्या अथेयना बाईलोनचा ५-० ने पराभव केला. या लढतीत उभय खेळाडूंनी एकमेकींना अनेकदा खाली पाडले. लवलिनाला पाचही जजेसने ३०-२७ असे समान गुण बहाल केले. लवलिनाला मंगळवारी आॅस्ट्रेलियाचा काये फ्रान्सेस स्कॉटच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. स्कॉटने अन्य लढतीत कजाखस्तानच्या अकरके बखितजानचा ५-० ने पराभव केला. भाग्यवतीने लाईट हेविवेट गटात पहिल्या फेरीत जर्मनीच्या इरिना श्कोनबर्गरचा ४-१ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)
उंचीचा फटका
भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक इटलीचे रफाएल बर्गामास्को म्हणाले, ‘भाग्यवतीची उंची थोडी कमी असून तिच्या पायाची हालचाल थोडी संथ आहे. अनुभवानंतर त्यात नक्कीत सुधारणा होईल. ती काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाली. बदल करण्यासाठी थोडा कालावधी अपेक्षित आहे. युवा खेळाडू बदल लवकर आत्मसात करतात.’
‘पहिल्या फेरीतील अडथळा पार केल्याचा आनंद आहे. यावेळी माझ्यवर दबाव होता, पण असे दबाव मी याआधीही अनेकदा यशस्वीपणे पार केले आहेत,’ असे मेरीकोम म्हणाली.