चार भारतीय उपांत्य फेरीत झुंजणार, आज शशी, अंकुशिता यांच्या कामगिरीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 03:36 AM2017-11-24T03:36:05+5:302017-11-24T03:36:16+5:30
भारतीय बॉक्सिंगच्या भविष्यातील आशास्थान असलेल्या चार बॉक्सर येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत आज शुक्रवारी उपांत्य फेरीत झुंजणार आहेत.
गुवाहाटी : भारतीय बॉक्सिंगच्या भविष्यातील आशास्थान असलेल्या चार बॉक्सर येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत आज शुक्रवारी उपांत्य फेरीत झुंजणार आहेत. ज्योती गुलिया, अंकुशिता बोरो, शशी चोप्रा आणि नेहा यादव आपापल्या वजन गटात प्रतिस्पर्धी खेळाडूंचे कडवे आव्हान मोडित काढून सुवर्णाकडे वाटचाल करतात काय, हे पाहणे रंजक ठरेल. एकूण दहा उपांत्य लढतींचा थरार सायंकाळी पाच वाजेपासून रंगणार आहे. बलाढ्य रशियाचे देखील चार बॉक्सर रिंगणात असतील. याशिवाय कझाकस्तानचे दोन तर चीन, मंगोलिया, थायलंड, तायपेई, आयर्लंड, जपान, पोलंड, तुर्कस्थान, इंग्लंड आणि व्हिएतनाम या संघातील प्रत्येकी एक बॉक्सर उपांत्य फेरीत नशीब आजमावणार आहे. सुदैवाने भारत आणि रशियाचे खेळाडू आज आमने- सामने नसतील.
फ्लायवेट गटात ज्योतीला कझाकस्तानची अब्द्रायमोवा झांसाया हिचे आव्हान असेल. अब्द्रायमोवाने काल पदकाची प्रबळ दावेदार मानली गेलेली अमेरिकेची हेवन गार्सियावर मात केली होती. आक्रमक, चपळ आणि बुद्धिमान खेळाडू असलेल्या अब्द्रायमोवावर विजय मिळवायचा झाल्यास ज्योतीला सावध खेळावे लागणार आहे.
फिदरवेट गटाच्या उपांत्य सामन्यात शशी चोप्रापुढे मंगोलियाची मोंघोर नामून हिचे तगडे आव्हान राहील. लाईट वेल्टर वेट गटात स्थानिक खेळाडू असलेली देशाची सर्वांत प्रतिभावान बॉक्सर अंकुशिता बोरो हिला थायलंडची साकेसरी थांचानोक हिच्याविरुद्ध उपांत्य सामना खेळायचा आहे.
थाायलंडचे खेळाडू नजर चुकवून ठोसा मारण्यात पटाईत असल्याचे ओळखून भारतीय संघाचे मुख्य कोच राफेल यांनी या लढतीसाठी नवे डावपेच आखले आहेत. गुरुवारी झालेल्या संघाच्या सरावादररम्यान याची झलक पाहायला मिळाली. नेहा यादव ही चौथ्या उपांत्य सामन्यात ८१ किलोवरील गटात कझाकस्तानची इस्लामबेकोवा दीनाविरुदद्ध खेळेल. नेहाला स्पर्धेच्या सोडतीदरम्यान थेट उपांत्य फेरीपर्यंत पुढे चाल मिळाल्याने भारताचे पदक आधीच निश्चित झाले होते.
>मी पदकांच्या नंबरवर नव्हे तर चांगल्या कामगिरीवर विश्वास बाळगतो. चांगली लढत दिली तर पदक येईलच. मी तर सात पदकांची अपेक्षा बाळगून आहे. स्वप्न साकार झााल्यास सर्वाधिक आनंद मला होईल. पण पदके नक्की जिंकू अशी आशा आहे. आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडंूचे सर्व व्हिडिओ पाहून डावपेच आखले आहेत. मी खेळाडूला त्यांच्या कुवतीनुसार डावपेच शिकविले आहेत. उद्या त्यांना रिंगणात अंमलबजावणी करावी लागेल.
- राफेल बर्गामास्को,
हाय परफॉर्मन्स संचालक