सीमावर चार वर्षांची बंदी डोपिंग नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 01:21 AM2019-12-29T01:21:58+5:302019-12-29T01:22:05+5:30
नवी दिल्ली : राष्ट्रकुल चॅम्पियनशिप भारोत्तोलन स्पर्धेत रौप्य विजेती भारतीय खेळाडू सीमा हिच्यावर डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांची ...
नवी दिल्ली : राष्ट्रकुल चॅम्पियनशिप भारोत्तोलन स्पर्धेत रौप्य विजेती भारतीय खेळाडू सीमा हिच्यावर डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीने (नाडा) यंदा विशाखापट्टणम येथे झालेल्या ३४ व्या महिला राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेदरम्यान सीमाचे डोप नमुने परीक्षणासाठी घेतले होते. वृत्तानुसार चॅम्पियनशिपदरम्यान गोळा करण्यात आलेल्या नमुन्यात प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. हे पदार्थ कामगिरी उंचावण्यासाठी घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बनवाबनवी आणि डोपिंग नियमांचे उल्लंघन असल्याचा निष्कर्ष नाडाने काढला आहे.
नमुन्यात हायड्रॉक्सी-४, मिथॉक्सी टेमोक्सिफेन, सिलेक्टिव्ह अॅस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलर, अॅनाबॉलिक स्टेरॉईड, आदी पदार्थ आढळून आले. हे सर्व पदार्थ वाडाच्या २०१९ च्या प्रतिबंधित औषधांच्या यादीत आहेत. नाडाच्या डोपिंगविरोधी शिस्तपालन समितीपुढे झालेल्या सुनावणीवेळी सीमाने समाधानकारक उत्तरे न दिल्याने तिच्यावर पुढील चार वर्षांची बंदी घालण्यात आली. सीमाने २०१७ च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपचे रौप्य जिंकले होते. २०१८ च्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत ती ७५ किलो गटात मात्र सहाव्या स्थानी राहिली होती.
यापूर्वी आशियाई रौप्यपदक विजेता मुष्ठीयोद्धा सुमित संगवान याच्यावरही डोपिंग प्रकरणी कारवाई केली आहे. सुमितवर नाडाने एक वर्षाची बंदी घातली आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेला सुमित संगवान ९१ किलो वजन गटातून खेळत
होता. आॅलिम्पिक पात्रता फेरीत तो खेळणार होता. त्यापूर्वीच त्याच्यावर बंदी घालण्यात आली. (वृत्तसंस्था)