चौथ्या वनडेत धोनीची कासवछाप फलंदाजी 114 चेंडूत 54 धावा
By admin | Published: July 3, 2017 10:51 AM2017-07-03T10:51:34+5:302017-07-03T15:29:07+5:30
चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवासाठी महेंद्रसिंह धोनीला जबाबदार धरण्यात येत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अँटिग्वा, दि. 3 - चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवासाठी महेंद्रसिंह धोनीला जबाबदार धरण्यात येत आहे. धोनीला जागतिक क्रिकेटमध्ये बेस्ट फिनिशर समजले जाते. धावांचा पाठलाग करताना मोक्याच्या क्षणी धोनीने अनेक सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. पण रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध 190 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनी सपशेल अपयशी ठरला.
धोनी 48 व्या षटकापर्यंत मैदानावर होता. पण धोनीला संघाला विजय मिळवून देता आला नाही. धोनीने 114 चेंडूत 54 धावांची कासवछाप खेळी केली. त्यासाठी धोनीला सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोल करण्यात आले. स्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या धोनीने अर्धशतकी खेळीत फक्त 1 चौकार लगावला.
या अर्धशतकासह धोनी मागच्या 16 वर्षातील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात धीमे अर्धशतक झळकवणारा भारतीय फलंदाज ठरला. धोनी खेळपट्टीवर असताना एक, दोन धावा पळून सतत धावफलक हलता ठेवतो. पण यावेळी धोनीला गॅप शोधता आला नाही. त्याचा मैदानावर धावांसाठी संघर्ष सुरु होता.
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताला वेस्ट इंडिजकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे दिग्गज वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळले. पाच बळी टिपणारा कर्णधार जेसन होल्डर वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आपली पिछाडी 1-2 अशी कमी केली.
वेस्ट इंडिजने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन 5, विराट कोहली 3 आणि दिनेश कार्तिक 2 हे झटपट माघारी परतल्याने तेराव्या षटकात भारताची अवस्था 3 बाद 47 अशी झाली होती. मात्र सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी चौथ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. रहाणे (60) आणि धोनी ( 54) धावांची खेळी केली. धोनी बाद झाल्यावर भारताचे सामन्यातील आव्हान संपुष्टात आले.