फ्रान्स, इंग्लंड यांचा बाद फेरीत प्रवेश
By admin | Published: June 19, 2015 02:15 AM2015-06-19T02:15:07+5:302015-06-19T02:15:07+5:30
फ्रान्स आणि इंग्लंड या बलाढ्य संघांनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम १६ संघांतील
ओट्टावा : फ्रान्स आणि इंग्लंड या बलाढ्य संघांनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम १६ संघांतील स्थान निश्चित केले आहे. त्याच वेळी कोलंबिया संघानेदेखील इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतरही अंतिम १६मध्ये जागा निश्चित केली.
स्पर्धेत तृतीय मानांकन लाभलेल्या फ्रान्सने कोलंबिया विरुद्ध झालेल्या पराभवानंतर दमदार पुनरागमन करताना मैक्सिकोचा ५-० असा फडशा पाडला. या धमाकेदार विजयासह फ्रान्सने ‘फ’ गटात सर्वाधिक ६ गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. मेरी लैरे डेल हिने ३४व्या सेकंदालाच जबरदस्त गोल करताना फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मैक्सिकोच्या जेनिफर रुइजने स्वयंगोल करताना फ्रान्सची आघाडी २-० अशी वाढवली. तर, ले सोमेर हिने २ गोल करताना कोलंबियाच्या आव्हानातली हवाच काढली. सामना संपण्यास अखेरची १० मिनिटे शिल्लक असताना आमांडाइन हेन्रीने अखेरचा गोल करून फ्रान्सच्या विजयावर शिक्का मारला. दुसऱ्या बाजूला इंग्लंडनेदेखील सहा गुणांची कमाई करताना चमकदार कामगिरी केली. मात्र, फ्रान्सच्या तुलनेत गोलसरासरीमध्ये मागे पडल्याने त्यांना द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. पहिल्याच सत्रात इंग्लंडने दोन गोल करताना सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. कॅरेन केरनी आणि फारा विलियम्स यांनी अनुक्रमे १५व्या व ३५व्या मिनिटाला गोल करून इंग्लंडला २-० अशा भक्कम स्थितीत आणले. (वृत्तसंस्था)