फ्रेंच ओपन टेनिस:दुहेरीतही क्रेजीकोवा विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 05:32 AM2021-06-14T05:32:41+5:302021-06-14T05:32:51+5:30
क्रेजीकोवाने सिनियाकोवासोबत हे तिसरे मेजर विजेतेपद पटकावले. आणि दुहेरीत अव्वल स्थानी पुनरागमन निश्चित केले आहे.
पॅरिस : फ्रेंच ओपनमध्ये पहिले एकेरी ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावल्यानंतर लगेचच बारबोरा क्रेजीकोवा हिने रविवारी येथे दुहेरी स्पर्धेतही जेतेपद पटकावले. ती २००० मध्ये मॅरी पियर्सनंतर रोलंड गॅरोज् मध्ये एकेरी आणि दुहेरी विजेतेपद पटकावणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे.
चेक प्रजासत्ताकच्या क्रेजीकोवा हिने कॅटरियान सिनायकोवासोबत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत पोलंडच्या इगा स्वियातेक आणि अमेरिकेच्या बेथानी माटेक सँड्स या जोडीला ६-४,६-२ असे पराभूत केले.
क्रेजीकोवाने सिनियाकोवासोबत हे तिसरे मेजर विजेतेपद पटकावले. आणि दुहेरीत अव्वल स्थानी पुनरागमन निश्चित केले आहे. क्रेजीकोवा आणि सिनायकोवा यांचे हे रोलंड गॅरोजमध्ये दुसरे विजेतेपद आहे. त्यांनी २०१८ मध्ये देखील येथे दुहेरीत विजेतेपद पटकावले होते. या दोन्ही खेळाडूंनी २०१३ मध्ये पॅरिसमध्ये ज्युनियर विजेतेपददेखील पटकावले. रोलंड गॅरोज् २०२० ची एकेरी चॅम्पियन स्वियातेक आणि माटेक सँड्स फक्त तिसऱ्या स्पर्धेत एकत्र खेळत होत्या. ही जोडी १-५ अशी पिछाडीवर होती. त्यांनी तीन गेम जिंकले मात्र क्रेजीकोवा आणि सिनियाकोवा यांना विजेतेपद मिळवण्यापासून त्या रोखु शकल्या नाहीत.
त्यांनी ४३ मिनिटातच पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये देखील क्रेजीकोवा आणि सिनयाकोवाने दबदबा निर्माण केला आणि बॅकहॅण्ड विनरने विजय मिळवला.