Leon Marchand, Paris Olympics 2024: दोन तासांत दोन सुवर्णपदके! फ्रान्सच्या जलतरणपटूने केली ४८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 05:00 PM2024-08-02T17:00:53+5:302024-08-02T17:04:59+5:30
Swimmer Leon Marchand, Paris Olympics 2024: २२ वर्षीय फ्रेंच जलतरणपटू लिओन मॅचॉनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली.
Swimmer Leon Marchand, Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारात तीन कांस्यपदके मिळवली. पण यंदाच्या जलतरण स्पर्धेत एक पदक जिंकण्याचा अनोखा विक्रम पाहायला मिळाला. प्रसिद्ध ऑलिम्पिक जलतरणपटू मायकेल फेल्प्सचे माजी प्रशिक्षक बॉब बोमन यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या लिओन मॅचॉनने या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत ३ पदके जिंकली आहेत. पण चर्चा एका वेगळ्याच पराक्रमाची आहे. २२ वर्षीय फ्रेंच जलतरणपटू लिओन मॅचॉनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली. तब्बल ४८ वर्षांनी त्याने हा पराक्रम करून दाखवला.
जलतरणपटूने रचला इतिहास
लिओन मॅचॉनने एक अतिशय संस्मरणीय कामगिरी केली. त्याने २०० मीटर बटरफ्लाय आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक पटकावले. १९७६ नंतर पहिल्यांदाच एका जलतरणपटूने ऑलिम्पिक स्पर्धेत एकाच दिवशी दोन सुवर्णपदके जिंकली. त्याने हंगेरीचा सध्याचा चॅम्पियन आणि जागतिक विक्रमवीर क्रिस्टोफ मिलाकचा पराभव करून २०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याच वेळी, त्याने २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये २:०५.८५च्या ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. याशिवाय, जलतरणात तीन सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला फ्रेंच खेळाडू ठरला.
फ्रान्समधील टूलूस येथे जन्मलेल्या लिओन मॅचॉन याचे वडील झेवियर यांनी १९९६ मध्ये अटलांटा गेम्स आणि २००० मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले होते. अटलांटा १९९६ मध्ये झेवियर २००० मीटर वैयक्तिक मेडल लिस्टमध्ये ८व्या स्थानावर होते. तर सिडनी २००० मध्ये ते ७व्या स्थानी होते. लिओन मॅचॉनची तुलना अनेकदा मायकेल फेल्प्सशी केली जाते. याशिवाय, लिओन मॅचॉनची आई सेलीनने बार्सिलोना या १९९२ मध्ये चार स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या होत्या. २०० मीटर वैयक्तिक शर्यतीत त्या १४व्या स्थानी होत्या.