भारतीय मल्लांकडून निराशा
By admin | Published: May 7, 2016 01:32 AM2016-05-07T01:32:06+5:302016-05-07T01:32:06+5:30
भारतीय ग्रीको रोमन पहिलवानांनी रियो आॅलिम्पिकसाठी दुसऱ्या आणि अखेरच्या जागतिक पात्रता स्पर्धेत विशेष निराशा केली आणि एकही पैलवान आॅलिम्पिक कोटा मिळवू शकला नाही.
इस्तंबूल : भारतीय ग्रीको रोमन पहिलवानांनी रियो आॅलिम्पिकसाठी दुसऱ्या आणि अखेरच्या जागतिक पात्रता स्पर्धेत विशेष निराशा केली आणि एकही पैलवान आॅलिम्पिक कोटा मिळवू शकला नाही. सर्वच मल्लांनी पहिल्याच फेरीत शरणागती पत्करली.
ग्रीको रोमनमध्ये अशा प्रकारे भारताला रिओ आॅलिम्पिकमध्ये एका कोट्यानिशीच समाधान मानावे लागले. त्यात हरदीपने एशियन आॅलिम्पिक क्वालिफिकेशन स्पर्धेत ९८ किलो वजन गटात आॅलिम्पिक कोटा मिळवला होता.
कजाकिस्तानच्या अस्ताना येथे झालेल्या पहिल्या विश्व क्वालिफिकेशन स्पर्धेत ग्रीको रोमनमध्ये एकही पैलवान कोटा मिळवू शकला नव्हता आणि आता दुसऱ्या आणि अखेरच्या विश्व पात्रतेमध्ये कोटा मिळवणे तर दूरच, भारतीय पहिलवान पहिल्या फेरीतही विजय मिळवू शकले नाहीत.
रविंदरला ५९ किलो वजन गटात, सुरेंद्र यादवला ६६ किलो वजन गटात, रवींद्र खत्रीला ८५ किलो वजन गटात आणि नवीनला १३0 किलो वजन गटात पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच ७५ किलो वजन गटात गुरप्रीतसिंहला जास्त वजन असल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. रविंदरला क्वालिफिकेशनमध्ये आॅलिम्पिक रौप्यपदक प्राप्त पहिलवान जॉर्जियाच्या रेवाज लाखशी याने ८-0 असे पराभूत केले, तर सुरेश यादवला फ्रान्सच्या आर्तक मरगारयानने ३-0 असे नमवले. रवींद्र खत्रीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली; परंतु त्याला प्री क्वॉर्टर फायनलमध्ये लिथुआनियाच्या लैमुतिस एडोमैतिस याच्याकडून ६-१0 असा पराभवाचा सामना करावा लागला. नवीनला बुल्गारियाच्या मिलोस्लाव्ह युरीएव्हने ९-0 अशी धूळ चारली. (वृत्तसंस्था)
भारताचा आणखी एक मल्ल अपात्र
आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय कुस्ती पथकाला १५ दिवसांत दुसऱ्यांदा मान खाली घालावी लागली आहे. विनेश फोगटपाठोपाठ गुरुप्रितसिंगही अधिक वजन असल्याने अपात्र घोषित झाला.
तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे सुरू असलेल्या विश्वपात्रता स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकाराच्या ७५ किलो वजन गटात गुरुप्रितचे वजन ५०० ग्रॅम अधिक वाढळले. ही रिओ आॅलिम्पिकसाठी अखेरची पात्रता स्पर्धा आहे. गत महिन्यात मंगोलियाच्या उलनबटोर येथे झालेल्या पात्रता स्पर्धेत विनेश ओव्हरवेट आढळताच अपात्र ठरला होता.
भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर म्हणाले, ‘गुरुप्रितचे वजन ५०० ग्रॅम अधिक आढळले. गुरुप्रित अपात्र झाल्याने या गटात भारताचा मल्ल राहणार नाही. या प्रकारासाठी कोचेस दोषी नाहीत पण मल्लाविरुद्ध कठोर कारवाई मात्र केली जाईल.’
तोमर पुढे म्हणाले, ‘भारतात परतल्यानंतर एक बैठक बोलविली जाईल. या बैठकीत गुरुप्रितवर कारवाईचा निर्णय होईल. कोचेसने मात्र गुरुप्रितच्या फिटनेससाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याने त्यांना दोषी धरता कामा नये.
भारतीय पथकातील ग्रीको रोमन तसेच फ्री स्टाईल मल्ल महिनाभरापासून जॉर्जियात सराव करीत होते. गुरुप्रितने सरकारी खर्चाचा दुरुपयोग केला. त्याच्यामुळे इभ्रतही गेल्याने त्याचे निलंबन जवळपास ठरले आहे.’