Emerson Royal Attacked: फुल्ल ऑन ड्रामा! नाईटक्लब बाहेर खेळाडूवर रोखली बंदूक, बेछूट गोळीबार अन् एक देवदूत!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 11:18 AM2022-06-04T11:18:55+5:302022-06-04T11:19:34+5:30
दोघांमध्ये तब्बल २९ राऊंड फायरिंग झालं..
Emerson Royal Attacked, Gunfire Battle: ब्राझीलच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक इमर्सन रॉयल एका मोठ्या संकटातून थोडक्यात बचावला. दरोड्याच्या उद्देशाने त्याच्यावर मोठं संकट आलं होतं, पण सुदैवाने इमर्सन सुखरूप राहिला. एका पोलिस कर्मचाऱ्याने अत्यंत नाट्यमय पद्धतीने इमर्सनवरील हल्ला परतवला. या पोलिसाने दरोडेखोरांशी झुंज दिली आणि इमर्सनला वाचवण्यात यश मिळविले. हा ऑफ-ड्युटी पोलीस ब्राझीलमधील नाईट क्लबच्या बाहेर इमर्सनचे फोटो काढत होता, तेव्हा एक दरोडेखोर आला आणि त्याने इमर्सनवर बंदूक रोखत त्याच्याकडील किमती सामान मागण्यास सुरूवात केली. मात्र पोलीस कर्मचाऱ्याने इमर्सनला या चोरापासून वाचवले.
नाट्यमय पद्धतीने बचावला इमर्सन-
बीबीसीच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने हल्लेखोराला पकडले आणि दोघांमध्ये गोळीबार झाला. मात्र, या दरम्यान फुटबॉलपटूला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. इमर्सनने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “मी तुमचा सदैव ऋणी राहीन. देव या भूमीवर देवदूत पाठवतो, याचा पुरावा मला माझ्या आयुष्यात दररोज मिळतो. मी या माणसाला देवदूत म्हणतो, माझा जीव वाचवण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला."
दोघांमध्ये 29 राउंड फायरिंग झालं...
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चोर आणि पोलिसात २९ राउंड फायर झाले. त्यानंतर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले असून त्याची प्रकृती आता चिंताजनक नाही, असे निवेदनात म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री तीन वाजता तो नाईट क्लबमधून बाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत हा अपघात झाला. इमर्सनच्या वडिलांनी ग्लोबो एस्पोर्टे या वृत्तपत्राला सांगितले की, "मी पार्टी करत होतो, बाहेर येत असताना ही दुर्घटना घडली जी खूप वाईट आहे. चोराने इमर्सनकडे त्याचे घड्याळ आणि इतर किमती सामान मागितले होते. पण सुदैवाने काही विचित्र घडलं नाही."