Neeraj Chopra: डायमंड लीगसाठी पूर्णपणे सज्ज - नीरज चोप्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 08:29 AM2022-06-20T08:29:13+5:302022-06-20T08:29:31+5:30
Neeraj Chopra: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने शनिवारी फिनलँड येथील क्योर्टाने क्रीडा स्पर्धेत ८६.६९ मीटर भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले होते. त्याआधी झालेल्या पाव्हो नुमी क्रीडा स्पर्धेतही त्याने स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडत ८९.३० मीटर भाला फेकून रौप्यपदक आपल्या नावे केले होते.
नवी दिल्ली : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने शनिवारी फिनलँड येथील क्योर्टाने क्रीडा स्पर्धेत ८६.६९ मीटर भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले होते. त्याआधी झालेल्या पाव्हो नुमी क्रीडा स्पर्धेतही त्याने स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडत ८९.३० मीटर भाला फेकून रौप्यपदक आपल्या नावे केले होते. त्यामुळे दुखापतीच्या शंकांना दूर करत आपण आगामी डायमंड लीगसाठी पूर्णपणे तयार असल्याचे नीरज चोप्राने म्हटले आहे.
क्योर्टाने स्पर्धेदरम्यान तिसऱ्या प्रयत्नात नीरज चोप्रा ट्रॅकवर घसरला होता. पावसामुळे भालाफेकपटूंसाठी प्रतिकूल परिस्थिती तयार झाली असल्याने ओल्या ट्रॅकचा फटका नीरजला धावताना बसला आणि तो घसरला. मात्र ही दुखापत फारशी गंभीर नसल्याने यातून तो लवकर सावरत मैदानावर आला. या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८६.६९ मीटर भाला फेकला. अखेरपर्यंत एकही भालाफेकपटू याच्या आसपासही येऊ न शकल्याने नीरजला सुवर्णपदकाचा मान मिळाला.
आपल्या या पराक्रमाबद्दल बोलताना नीरज म्हणाला, खराब हवामानामुळे आमच्यासाठी प्रतिकूल परिस्थिती तयार झाली होती. मात्र त्यावर मात करत अव्वल कामगिरी करता आल्याने मी खूश आहे. आता ३० जूनला होणाऱ्या डायमंड लीगसाठी मी सरावाला जोमात सुरुवात करणार आहे. क्टोर्टाने स्पर्धेत नीरजला त्याच्या सर्वोत्तम कामगिरीला भलेही मागे टाकता आले नसलेही मात्र सुवर्णपदकासाठी ही कामगिरी पुरेशी ठरली.
भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे स्पष्टीकरण
नीरज चोप्राच्या दुखापतीबाबत भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने (एएफआय) स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, 'क्योर्टाने स्पर्धेत भालाफेकीच्या तिसऱ्या प्रयत्नात नीरज घसरला होता. पण तो सध्या पूर्णपणे तंदुरुस्त असून घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. नीरजा पुन्हा एका सुवर्ण कामगिरीसाठी आमच्या शुभेच्छा.'