दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गंभीरचे पुनरागमन
By admin | Published: September 27, 2016 11:51 PM2016-09-27T23:51:13+5:302016-09-27T23:51:13+5:30
भारताचा डावखुरा शैलीदार सलामीवीर गौतम गंभीरचे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे.
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २७ : भारताचा डावखुरा शैलीदार सलामीवीर गौतम गंभीरचे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुध्दच्या उर्वरीत दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची सलामीवीर लोकेश राहुलच्या जागी निवड झाली. राहुल दुखापतग्रस्त झाल्याने गंभीरची संघात वर्णी लागली.
विशेष म्हणजे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सातत्यपुर्व कामगिरी करुन देखील संघात निवड न झाल्याने राष्ट्रीय निवड समितीला क्रिकेट चाहत्यांच्या विशेष करुन गंभीरच्या पाठिराख्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, आता राहुल दुखापतग्रस्त झाल्याने गंभीरची निवड करण्यात आल्याने क्रिकेटचाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अजय शिर्के यांनी याबाबत माहिती दिली की, कानपूर कसोटीमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने राहुल संघाबाहेर गेला असून कोलकाता आणि इंदोर कसोटीसाठी त्याच्याजागी गंभीरची निवड करण्यात आली आहे.
भारताकडून आतापर्यंत ५६ कसोटी खेळलेल्या गंभीरकडे दिर्घकाळापर्यंत दुर्लक्ष झाले होते. आॅगस्ट २०१४ साली गंभीरने आपला शेवटचा सामना ओव्हल येथे इंग्लंडविरुध्द खेळला होता. मात्र, नुकताच झालेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत गंभीरने सातत्यपुर्ण कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले होते.