खेळाला कारकिर्दीच्या दृष्टिने पाहणे सुरू झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 01:57 AM2020-02-28T01:57:35+5:302020-02-28T01:58:08+5:30
खेलो इंडिया योजनेत हजारो युवा खेळाडूंना मदत होत आहे.
- अखिल कुमार लिहितात...
खेलो इंडियाच्या माध्यमातून देशात क्रीडा संस्कृतीचा विकास होताना पाहात आहे. तरीही अगदी सुरुवातीच्या पातळीपासून क्रीडा संस्कृती विकसित होण्याची गरज आहे. २०१८ ला नवी दिल्लीत आयोजित झालेल्या खेलो इंडियाच्या आयोजनापासून भारतीय क्रीडाक्षेत्र प्रगती साधेल याची जाणीव झाली होती. २०१९ आणि २०२० च्या यूथ गेम्समधून अनेक प्रतिभा पुढे आल्या. आता खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंना उच्च दर्जाची चढाओढ अनुभवायला मिळत आहे.
मी १९६४ ला बॉक्सिंग सुरू केले, तेव्हा कारकिर्द म्हणून खेळाकडे पाहिले जात नव्हते. २०२० मध्ये मात्र अनेकघरांमध्ये खेळाची चर्चा सुरु झाली. घराघरात लोक खेलो इंडिया गेम्सवर व या स्पर्धेतील आपल्या मुलांच्या कामगिरीवर चर्चा करतात. या माध्यमातून आलेली सकारात्मकता खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेपर्यंत पोहोचली. खेळातही कारकिर्द होऊ शकते, असा विचार आता लोक करुलागले. खेळ उपजीविकेचे साधनही बनू शकते. खेळावरील खर्चाची पालकांची चिंता आता खेलो इंडिया शिष्यवृत्तीमुळे कमी झाली.
मी हरयाणा पोलीस दलात कार्यरत आहे. माझी नियुक्ती गुडगावला आहे. येथे मी दररोज वाहतुकीचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होताना पाहतो. अनेक सुशिक्षित लोक वाहन योग्यपद्धतीने पार्क करीत नाही. त्यांनी ड्रायव्हिंग शिकले, पण नियमांचे पालन नाही. नेमके हेच सूत्र खेळात लागू होते. खेळ शिकण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. खेलो इंडिया स्पर्धांमुळे युवा खेळाडूंची जडणघडण करण्यास आपण सक्षम होत आहोत.
खेलो इंडिया योजनेत हजारो युवा खेळाडूंना मदत होत आहे. यामुळे भविष्यात देशाला आॅलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करणारे खेळाडू गवसतील. देशात समूृद्ध क्रीडा संस्कृती रुजविण्याची ही सुरुवात आहे. खेलो विद्यापीठ स्पर्धा क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ठरेल.
(बॉक्सर अखिल कुमार आॅलिम्पिक खेळाडू असून एनआयएस प्रशिक्षक आहेत.)