रवी शास्त्रींच्या नावाला होता गांगुलीचा ठाम विरोध

By admin | Published: July 13, 2017 12:44 AM2017-07-13T00:44:02+5:302017-07-13T00:44:02+5:30

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अखेर रवी शास्त्री यांची सरशी झाली

Ganguly strongly opposed to Ravi Shastri's name | रवी शास्त्रींच्या नावाला होता गांगुलीचा ठाम विरोध

रवी शास्त्रींच्या नावाला होता गांगुलीचा ठाम विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अखेर रवी शास्त्री यांची सरशी झाली; पण त्याआधीचे नाट्य फारच गमतीशीर होते. पहिल्यांदा शास्त्रींची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत बीसीसीआयने शास्त्रींच्या नियुक्तीच्या वृत्ताचे खंडन केले. सल्लागार समिती आणि बीसीसीआय निवडीवर अजूनही चर्चा करत असल्याचे कारण त्या वेळी देण्यात आले होते. त्यानंतर रात्री बीसीसीआयनेच रवी शास्त्री यांच्या नावाची पुन्हा एकदा अधिकृतरीत्या घोषणा केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी शास्त्रींची निवड ही सर्वानुमते झाली नसल्याचे तथ्य पुढे येत आहे. क्रिकेट सल्लागार समितीच्या बैठकीत सचिन तेंडुलकरने सर्वप्रथम शास्त्री यांच्या नावाला आपली पसंती देत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. सचिनने लक्ष्मणचे मत स्वत:कडे वळविण्यात यश मिळविले होते. सौरभ गांगुली मात्र रवी शास्त्रींऐवजी टॉम मुडी यांंच्याकडे प्रशिक्षकपद सोपविण्यास उत्सुक होता.
वर्षभरापूर्वी झालेल्या निवड प्रक्रि येत सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यात वाद झाले होते. बँकॉकमध्ये सुटीवर असताना शास्त्रींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षकपदाची मुलाखत देण्यास गांगुलीचा विरोध होता. गांगुलीच्या मते मोठी जबाबदारी स्वीकारताना शास्त्रींनी दाखवलेला अ‍ॅप्रोच योग्य नव्हता. त्यामुळे मागच्या वर्षी सल्लागार समितीने अनिल कुंबळेंना प्रशिक्षकपद दिले.
वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद मुंबईत झालेल्या बैठकीत यंदा उमटले. रवी शास्त्रींकडे संघाची जबाबादारी द्यायला सौरव गांगुली यावेळीही तयार नव्हते. तथापि, बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांनी संपूर्ण संघाला शास्त्रीच प्रशिक्षक म्हणून हवे असल्याचे निदर्शनास आणून दिले. तरीही गांगुली शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब करायला तयार नव्हते. अखेर लक्षमणने पुढाकार घेत शास्त्रींच्या नावाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर करताच गांगुलीचा विरोध मावळला.
कर्णधार विराट कोहलीपुढे बीसीसीआय आणि सीएसीने लोटांगण घातले असा चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी टॉम मूडी व वीरेंद्र सेहवाग यांची नावे मीडियापुढे आणण्यात आली. यामुळे प्रशिक्षक म्हणून कोण बाजी मारणार, याबाबत संभ्रम वाढत गेला. अखेर रात्री उशिरा बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी अधिकृतपणे रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली.
रवी शास्त्री यांच्याप्रमाणे गोलंदाजी प्रशिक्षक जहीर खान यांच्या नावावरही एकमत झाले नसल्याचे तथ्य बाहेर आले आहे. शास्त्रींना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून बी. अरु ण हवे होते, पण गांगुलीने विराटशी चर्चा करीत जहीर खान याच्या नावाला काही विरोध आहे का हे आधीच चाचपडून पाहिले होते.
कोहलीने जहीर खानच्या नावाला आक्षेप नसल्याचे सांगताच गांगुलीने शास्त्री यांना तुम्ही पसंती देत असाल तर गोलंदाजी कोच जहीरला बनवा, असा हेका कायम ठेवला. गांगुलीचा सन्मान राखणे गरजेचे झाले आहे, असे ध्यानात येताच सचिन आणि लक्ष्मण यांनी जहीरचे नाव फायनल केले.
शास्त्री आणि कोहली यांच्यावर अंकुश राखता यावा म्हणून बीसीसीआयने आणखी एक खेळी खेळली. परदेशातील विशेष दौऱ्यात राहुल द्रविड यांचा सल्ला घेणे अनिवार्य राहील, अशी ही यशस्वी खेळी खेळताना द्रविडकडे फलंदाजी सल्लागारपद सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Ganguly strongly opposed to Ravi Shastri's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.