इंग्लंड कसोटी मालिकेवर गांगुलीची भविष्यवाणी
By Admin | Published: November 3, 2016 01:16 PM2016-11-03T13:16:34+5:302016-11-03T14:58:27+5:30
कसोटी मालिकेत भारत इंग्लंडवर सहजपणे विजय मिळवेल अशी भविष्यवाणी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने केली आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने इंग्लंड कसोटी मालिकेवर भविष्यवाणी केली आहे. कसोटी मालिकेत भारत इंग्लंडवर सहजपणे विजय मिळवेल अशी भविष्यवाणी सौरभ गांगुलीने केली आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये 9 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. नुकत्याच मायदेशात झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला ३-० असा क्लीन स्विप दिल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
'भारतीय संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडप्रमाणे अजून एकदा भारत व्हाईटवॉश देण्यासाठी तयार आहे अशी मला आशा आहे. इंग्लंड संघाने सावध राहायला हवं,' असं गांगुली बोलला आहे.
गांगुलीप्रमाणे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही 'इंग्लंड संघाकडे स्पिनर्सची कमतरता असून, फलंदाज बांगलादेश विरोधात खेळताना अडखळत असल्याचं दिसत होतं,' असं म्हटलं आहे. भारताच्या अश्विन आणि रवींद्र जाडेजासारख्या उत्तम फिरकीपटूंना सामोरं जाताना, इंग्लंडला प्रचंड सावधानता बाळगायला हवी, असंही वॉनने नमूद केलं.
इंग्लंड संघ ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी राजकोटला रवाना होणार आहे. मालिकेतील अन्य कसोटी सामने विशाखापट्टणम (१७ ते २१ नोव्हेंबर), मोहाली (२६ ते ३० नोव्हेंबर), मुंबई (८ ते १२ डिसेंबर) आणि चेन्नई (१६ ते २० डिसेंबर) येथे खेळल्या जाणार आहेत.
मागच्या दोन कसोटी मालिकात इंग्लंडने भारतावर मिळवला विजय
बांगलादेश दौ-यात निराशाजनक कामगिरी करुन इंग्लंडचा संघ भारतात आला आहे. पण शेवटच्या भारत दौ-यातील कामगिरी इंग्लंडचा उत्साह वाढवणारी आहे. २०१२-१३ मध्ये इंग्लिश संघ भारत दौ-यावर आला होता. त्यावेळी इंग्लंडने मालिका २-१ ने जिंकली होती. ३१ वर्षानंतर भारत आणि इंग्लंड पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहेत. यापूर्वी १९८४-८५ साली दोन्ही देश पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळले होते.
दोन वर्षांपूर्वी २०१४ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौ-यावर गेला होता. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका इंग्लंडने ३-१ ने जिंकून पतौडी ट्रॉफीवर कब्जा केला होता.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, मोहंमद शमी, गौतम गंभीर, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, हार्दिक पंड्या, उमेश यादव, करुण नायर, अमित मिश्रा, वृद्धिमान साहा आणि चेतेश्वर पुजारा.