gaurav-bidhuri_भारताची कामगिरी समाधानकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 03:23 AM2017-09-02T03:23:50+5:302017-09-02T03:24:18+5:30
हॅम्बुर्ग : भारताने एकच कास्यपदक जिंकले असले तरी बॉक्सिंग प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी १९ व्या विश्व चॅम्पियनशिपदरम्यान काही सकारात्मक बाबी राहिल्या असून, त्यात चीनसारखा ‘पॉवर हाऊस’ देश देखील एकही पदक जिंकू शकला नाही, असे म्हटले आहे.
गौरव बिधुडी (५६ किलो) याने देशासाठी एकमेव कास्यपदक जिंकले आहे. यासह तो विजेंदरसिंह (२००९), विकास कृष्ण (२०११) आणि शिव थापा (२०१५) या विश्व स्पर्धेत पदक जिंकणाºयांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. प्रगतीच्या दृष्टिकोनातून भारताचे तीन मुष्टियोद्ध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आणि त्यानुसार भारत रशिया आणि युक्रेनच्या बरोबरीने राहिला. एवढेच नव्हे तर भारत बॉक्सिंगमध्ये दिग्गज असलेले इंग्लंड आयर्लंड, दक्षिण कोरिया व मंगोलियाच्या बरोबरीत राहिला. या देशाचेही एकच खेळाडू उपांत्य फेरी गाठू शकले.
नीवा पुढे म्हणाले, ‘काही प्रमाणात मी समाधानी आहे. आम्ही स्पर्धेसाठी काही व्यूहरचना आखली होती, त्यापैकी काहींची अंमलबजावणी झाली. आता आम्हाला जी व्यूहरचना आखली जाईल ती पूर्णपणे कार्यान्वित करण्याविषयी निश्चित प्रयत्न करावे लागेल. आम्हाला एक पदक मिळाले आणि आम्ही आणखी जिंकू इच्छित होतो; परंतु चीनसारखे बलाढ्य संघ एकही पदक जिंकू शकले नाही. त्यामुळे भारताची कामगिरी खूप निराशाजनक झालेली नाही.’’
नीवा यांनी एप्रिलमध्ये भारताच्या विदेशी प्रशिक्षकाची जबाबदारी पेलली होती आणि संघासोबत त्यांची ही पहिलीच मोठी स्पर्धा होती. (वृत्तसंस्था)