बीसीसीआयसाठी गावस्कर महागडे, करार येणार संपुष्टात?
By admin | Published: April 5, 2016 09:55 AM2016-04-05T09:55:05+5:302016-04-05T09:58:25+5:30
भारताचे माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक सुनील गावस्कर आणि बीसीसीआयची ब-याच काळापासूनची पार्टनरशिप संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - भारताचे माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक सुनील गावस्कर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ब-याच काळापासूनची पार्टनरशिप संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयशी असलेला करार लवकरच संपणार असून हा करार पुढे वाढवण्यात बीसीसीआयला कोणताही रस नसल्याचे वृत्त आहे. आणि त्यामागचे कारण आहे, की इतर कॉमेंट्रेटर्सच्या (समालोचक) तुलनेत बीसीसीआयसाठी गावस्कर अतिशय महागडे ठरत असून त्यामुळेच आता बीसीसीआयने त्यांच्याशी असलेला करार पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर कॉमेंट्रेटर्सच्या तुलनेत गावस्कर यांना अधिक मानधन मिळते. इतर समालोचकांना एका सामन्यासाठी ३५ हजार ते १ लाखांच्यादरम्यान मानधन दिले जात असताना गावस्कर यांना त्यांच्यापेक्षा आठपठ अधिक मानधन दिले जाते. त्यामुळेच बीसीसीआयसाठी ते अतिशय महागडे ठरत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, गावस्करांशी असलेला करार संपल्यानंतर तो पुढे न वाढवण्याचा निर्णय घेणा-या बीसीसीआयने गावस्कर यांचा ज्युनिअर असलेल्या संजय मांजरेकरशी फुल-टाईम कॉमेंट्रेटर म्हणून करार करून हर्षा भोगलेसोबत काम करू देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान मांजरेकर यांना ३६.४९ लाख रुपये तर अनिल कुंबळेला ३९ लाख रुपये मानधन देण्यात आले होते. मात्र त्याच वेळेस गावस्कर यांना सुमारे ९० लाख रुपयांचे मानधन देण्यात आले.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवरच बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे समजते.