गेल, हसीचा विक्रम कोहलीच्या आवाक्यात

By admin | Published: May 9, 2016 12:05 AM2016-05-09T00:05:29+5:302016-05-09T04:48:19+5:30

आपल्या तुफान फॉर्मच्या जोरावर सध्या क्रिकेटविश्व गाजवणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हळूहळू विविध विश्वविक्रम पादाक्रांत करीत आहे

Gayle, Hussey's record in the scoring of Kohli | गेल, हसीचा विक्रम कोहलीच्या आवाक्यात

गेल, हसीचा विक्रम कोहलीच्या आवाक्यात

Next

नवी दिल्ली : आपल्या तुफान फॉर्मच्या जोरावर सध्या क्रिकेटविश्व गाजवणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हळूहळू विविध विश्वविक्रम पादाक्रांत करीत आहे. आयपीएलमध्येही त्याने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावल्या असून, एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा ख्रिस गेल आणि मायकल हसी यांचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी यंदा कोहलीला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असलेल्या कोहलीने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ८ सामन्यांतून ९०.१६च्या जबरदस्त सरासरीने ५४१ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये कोहलीने दोन शतके आणि चार अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याचबरोबर यंदा त्याने दोन शतके झळकावताना आयपीएल इतिहासात एकाच मोसमात एकापेक्षा अधिक शतके झळकावणारा पहिला फलंदाज म्हणूनही मान मिळवला आहे. विराटने राइजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध नाबाद १०८ धावा कुटताना स्पर्धेत वैयक्तिक ५०० धावांचा पल्ला गाठला.
सध्या कोहली ज्या फॉर्ममध्ये आहे त्याकडे बघताना तो आयपीएलच्या एकाच सत्रात सर्वाधिक ७३३ वैयक्तिक धावा फटकावण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडू शकतो. तसेच चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळलेल्या आॅस्टे्रलियाच्या मायकल हसीने देखील ७३३ धावा काढल्या होत्या. गेल व हसी यांनी अनुक्रमे २०१२ व २०१३ साली ही कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये कोहलीने २०१३मध्ये ६३४ धावा फटकावल्या होत्या. विशेष म्हणजे कोहली फक्त आयपीएलमध्येच नाही तर याआधी २०१६च्या सुरुवातीपासून चार महिन्यांत झालेल्या टी-२० सामन्यांतही तुफान फॉर्ममध्ये होता. कोहलीने यंदाच्या वर्षी आतापर्यंत १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२५ च्या सरासरीने ६२५ धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने ७ वेळा अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या वर्षी आतापर्यंत एकूण २१ टी-२० सामन्यांतून कोहलीने ११६६ धावा काढल्या आहेत. (वृत्तसंस्था)
>>> आशिया चषक स्पर्धेत कोहलीने ७, ४९, नाबाद ५६ आणि नाबाद ४१ धावा केल्या. स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या भारताच्या यशात कोहली निर्णायक ठरला होता.
घरच्या मैदानावर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली होती.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत कोहलीने २३, नाबाद ५५, २४, नाबाद ८२ आणि नाबाद ८९ अशी खेळी करून भारताला उपांत्य फेरीत नेले.
हाच फॉर्म आयपीएलमध्ये कायम राखताना कोहलीने राजकोटला गुजरात लायन्सविरुद्ध नाबाद १००
धावा करून पहिले टी-२० शतक झळकावले. तर दोन सामन्यांनंतर पुन्हा एकदा
शतक झळकावताना कोहलीने दुसरे टी-२० शतक
झळकावले.

Web Title: Gayle, Hussey's record in the scoring of Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.