जर्मनीने इतिहास बदलला, इटलीला नमवून युरो कपच्या उपांत्यफेरीत दाखल
By admin | Published: July 3, 2016 03:16 AM2016-07-03T03:16:57+5:302016-07-03T09:21:02+5:30
इटलीकडून पराभूत होण्याचा इतिहास मोडून काढत जर्मनीने इटलीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ६-५ असा विजय मिळवत युरो चषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.
Next
ऑनलाइन लोकमत
बोर्डेक्स, दि. ३ - महत्वाच्या सामन्यामध्ये इटलीकडून पराभूत होण्याचा इतिहास मोडून काढत जर्मनीने इटलीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ६-५ असा विजय मिळवत युरो चषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. अपेक्षेप्रमाणे हा सामना जगभरातील फुटबॉल चाहत्यांना रोमहर्षक अनुभवाची प्रचिती देणारा ठरला.
शूटआऊटमध्ये एकूण १८ पेनल्टी किक लगावल्या गेल्या. त्यावरुन किती उत्कंठावर्धक सामना होता याची कल्पना येते. या सामन्यादोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केल्यामुळे निर्धारीत ९० मिनिटात त्यानंतर अतिरिक्त वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
मोक्याच्या क्षणी जर्मन संघाने आपली कामगिरी उंचावत ६-५ असा विजय मिळवला. पूवार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला जर्मनीच्या जोनास हेक्टरने गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर काही मिनिटांनी ७८ व्या मिनिटाला इटलीच्या बोन्यूसीने बरोबरी करणारा गोल नोंदवला.
त्यानंतर दोन्ही संघ अतिरिक्तवेळेपर्यंत १-१ बरोबरीत राहिले. यापूर्वी जर्मनी संघाला बादफेरीत इटलीविरुद्ध एकदाही विजय मिळवता आला नव्हता. १९६२ वर्ल्डकपपासून ही परंपरा सुरु होती. जर्मन खेळाडूंनी इतिहासाचे कोणतेही दडपण न घेता मानसिक कणखरता दाखवत नवा अध्याय लिहीला. जर्मनीचा संघ सलग सहाव्यांदा मोठया स्पर्धेच्या उपांत्यफेरीत दाखल झाला आहे. जर्मन संघाने २०१४ मध्ये अर्जेंटिनाला नमवून फुटबॉलचे विश्वविजेतेपद मिळवले होते.