कॅमेरूनला हरवून जर्मनी उपांत्य फेरीत
By admin | Published: June 27, 2017 12:50 AM2017-06-27T00:50:21+5:302017-06-27T00:50:21+5:30
विश्वविजेत्या जर्मन फुटबॉल संघाने कॅमेरूनवर ३-१ ने सरशी साधून कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली.
सोची (रशिया) : विश्वविजेत्या जर्मन फुटबॉल संघाने कॅमेरूनवर ३-१ ने सरशी साधून कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. स्पर्धेच्या ब गटात जर्मनीने रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात द. आफ्रिका कप आॅफ नेशन्स चॅम्पियन्स कॅमेरूनला पराभूत करीत अव्वल स्थानावर झेप घेतली.
पूर्वार्धातील खेळात उभय संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले. तथापि, उत्तरार्धात खेळ सुरू होताच तिसऱ्या मिनिटाला केरेम डेर्मिबे याने जर्मनीसाठी शानदार गोल नोंदवत खाते उघडले. एक गोलने माघारताच कॅमेरूनचे खेळाडू आक्रमक झाले. या संघाचा बचाव फळीतील खेळाडू अर्नेस्ट माबुका याला नियमबाह्य खेळ केल्याबद्दल रेफ्रीने ६४ व्या मिनिटाला ‘रेड कार्ड’ दाखवीत मैदानाबाहेर केले. याचा लाभ घेत तीन मिनिटांनंतर जर्मनीकडून टिमो वॉर्नर याने दुसरा गोल नोंदविला.
कॅमेरूनच्या खेळाडूंची देखील गोल नोंदविण्याची धडपड कायम होती. तब्बल ७९ मिनिटांचा खेळ झाल्यानंतर त्यांना यश आले. आक्रमक विन्सेंट अबुबाकर याने सहकाऱ्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळवून दिली; पण कॅमेरूनचा आनंद क्षणिक टिकला. खेळ संपायला नऊ मिनिटांचा अवधी असताना वॉर्नरने स्वत:चा दुसरा आणि संघाचा तिसरा गोल करीत संघाचा विजय निश्चित केला. कमेरून स्पर्धेबाहेर पडला, तर जर्मनीला ब गटात सात गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेता आली. जर्मनीची उपांत्य फेरीत गाठ ‘अ’ गटातील उपविजेत्या मेक्सिकोविरुद्ध २९ जून रोजी पडणार आहे. (वृत्तसंस्था)