जर्मनीची अंतिम फेरीत धडक
By admin | Published: July 1, 2017 02:04 AM2017-07-01T02:04:16+5:302017-07-01T02:04:16+5:30
लिओन गोरेट्झा याने झळकावलेल्या शानदार दोन गोलच्या जोरावर विश्वविजेत्या जर्मनीने कॉन्फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेच्या
सोची (रशिया) : लिओन गोरेट्झा याने झळकावलेल्या शानदार दोन गोलच्या जोरावर विश्वविजेत्या जर्मनीने कॉन्फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना मैक्सिकोला ४-१ असे लोळवले. विशेष म्हणजे या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा जर्मनीचा संघ चौथा युरोपियन संघ ठरला आहे. जर्मनीआधी डेन्मार्क, फ्रान्स आणि स्पेन यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
अप्रतिम आक्रमक खेळ केलेल्या जर्मनीची सुरुवात धडाकेबाज होती. गोरेट्झा याने यावेळी सर्व सुत्रे आपल्याकडे घेताना सुरुवातीपासूनच मैक्सिकोवर कमालीचे दडपण आणले. त्याने सामन्याची पहिले पाच मिनिटे झाल्यानंतर मैक्सिकोच्या गोलक्षेत्रात काही आक्रमक चाली रचून त्यांची बचावफळी खिळखिळी केली. त्यातच, सहाव्या आणि आठव्या मिनिटावर गोरेट्झाने शानदार गोल करुन जर्मनीला २-० अशी दमदार आघाडी मिळवून दिली.
या स्वप्नवत सुरुवातीनंतर जर्मनीने आणखी आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. यानंतर, मैक्सिकोने अतिबचावात्मक पवित्रा घेत जर्मनीचे आक्रमण रोखण्यात यश मिळवल्याने मध्यंतराला जर्मनीचे वर्चस्व कायम राहिले.
दुसऱ्या सत्रात मात्र पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत जर्मनीने मैक्सिकोचे उरले सुरले आव्हान संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी, टिमो वर्नर (५९ मिनिट) आणि आमिन यूनिस (९१ मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करताना जर्मनीचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
दरम्यान, मैक्सिकोकडून एकमेव गोल मार्को फाबियान (८९ मिनिट) याने केला. परंतु, तोपर्यंत मैक्सिकोचा पराभव निश्चित झाला होता. विजेतेपदासाठी जर्मनीला रविवारी सेंट पिटर्सबर्ग येथे बलाढ्य चिलीच्या तगड्या आव्हानास सामोरे जावे लागेल. तसेच, मैक्सिको आणि पोर्तुगाल यांच्या तिसऱ्या स्थानासाठी अटीतटीची लढत होईल. (वृत्तसंस्था)