जर्मनीचा ‘गोल्डन’ इरा !

By admin | Published: July 15, 2014 03:41 AM2014-07-15T03:41:16+5:302014-07-15T03:41:16+5:30

व्यूहरचना आधीच ठरलेली... लिओनेल मेस्सीला अडकवून ठेवले की, अर्जेंटिनाचे आक्रमण कुचकामी होईल, हे जर्मनीने आधीच हेरलेले...

Germany's 'Golden' Ira! | जर्मनीचा ‘गोल्डन’ इरा !

जर्मनीचा ‘गोल्डन’ इरा !

Next

रिओ दि जानेरो : व्यूहरचना आधीच ठरलेली... लिओनेल मेस्सीला अडकवून ठेवले की, अर्जेंटिनाचे आक्रमण कुचकामी होईल, हे जर्मनीने आधीच हेरलेले... सर्व काही रणनीतीने सुरू होते; परंतु अर्जेंटिनाचेही ‘हौसले बुलंद’ असल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जातो की काय? असा प्रश्न (चिंता) सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ९० मिनिटांत सामना गोलशून्य राहिल्यानंतर अतिरिक्त ३० मिनिटांत चमत्कार झाला. ८८व्या मिनिटाला जर्मनीचा स्टार खेळाडू मिराक्लोव क्लोसेला रिप्लेसमेंट म्हणून आलेल्या मारिओ गोत्झेने कुणाच्या ध्यानीमनी नसताना ११३व्या मिनिटाला अप्रतिम गोल केला. सबस्टिट्यूट म्हणून मैदानावर उतरलेल्या अँड्रे स्कुरल आणि गोत्झे यांनी २४ वर्षांचा जर्मनीचा जेतेपदाचा दुष्काळ संपविला.
डाव्या कॉर्नरवरून अर्जेंटिनाची बचावफळी भेदत स्कुरलने गोलपोस्टच्या दिशेने टोलावलेला चेंडू गोत्झेने पहिला आपल्या छातीवर झेलला आणि नंतर डाव्या पायाने किक मारून तो गोलमध्ये रूपांतरित केला. १९९०च्या इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हा क्षण होता. जर्मनीने या आघाडीबरोबरच सामना १-० असा जिंकून ३.५ कोटी डॉलर्सचे पारितोषिक आणि विश्वचषक आपल्या नावावर केला. सामन्याच्या सुरुवातीला चेंडूवर जर्मनीचा ताबा असला तरी अर्जेंटिनाचे खेळाडू आक्रमक होते. ३0 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या हिगुएनने चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली; परंतु लाईनमन यांनी तो आॅफसाईड दिला. त्यामुळे हिगुएनचा जल्लोष अल्पकाळातच हवेत विरला. त्यानंतर मेस्सीने दोनदा आक्रमण केले; परंतु ते सार्थकी लागले नाही. ३६ व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा गोलरक्षक रोमेरोने एक फटका अलगद झेलून गोल वाचविला.
दुसऱ्या हाफमध्ये हाच धमाका कायम राखत जर्मनीने सामन्यातील रंजकता आणखी ताणली. अर्जेंटिनाचे प्रशिक्षक अलजेंड्रो सॅबेल्ला यांनी इझेक्वील लॅवेझ्झी याच्याबदली सेर्गिओ अ‍ॅगुएरो याला मैदानात उतरवले. अ‍ॅगुएरो हा आक्रमक आणि तितकाच चतुर खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याच्या या लेट एन्ट्रीने अर्जेंटिनाला थोडी फार मदत मिळेल, असा अंदाज सॅबेल्ला यांनी बांधला असावा, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. सामन्याची वेळ संपत येईल तसे दोन्ही प्रशिक्षकांनी आपआपले खेळाडू बदलले, पण तरीही गोलफलक हलला नाही. शेवटी पूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरी झाल्याने एक्स्ट्रा टाईम देण्यात आला. (वृत्तसंस्था)

Web Title: Germany's 'Golden' Ira!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.