जर्मनीची विजयी सलामी
By admin | Published: June 21, 2017 12:45 AM2017-06-21T00:45:51+5:302017-06-21T00:45:51+5:30
विश्वविजेत्या जर्मनीने फिफा कॉन्फेडरेशन्स कप फुटबॉल स्पर्धेची यशस्वी सुरुवात करताना अटीतटीच्या सामन्यात आॅस्टे्रलियाचे आव्हान ३-२ असे परतावले
मॉस्को : विश्वविजेत्या जर्मनीने फिफा कॉन्फेडरेशन्स कप फुटबॉल स्पर्धेची यशस्वी सुरुवात करताना अटीतटीच्या सामन्यात आॅस्टे्रलियाचे आव्हान ३-२ असे परतावले. सोमवारी झालेल्या या सामन्यात तुलनेत दुबळ्या असलेल्या आॅस्टे्रलियाविरुद्ध विजयासाठी जर्मनीला चांगलेच झुंजावे लागले.
सामन्यात विश्वविजेत्यास साजेशी सुरुवात करताना जर्मनीने आक्रमक खेळ करताना आॅस्टे्रलियावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. लार्स स्टिंडल याने पाचव्याच मिनिटाला आक्रमक गोल करून जर्मनीला आघाडीवर नेले. मात्र, आॅस्टे्रलियाने जोरदार प्रत्युत्तर दिले. टॉम रॉजिक याने ४०व्या मिनिटाला महत्त्वपूर्ण गोल करताना आॅस्टे्रलियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मात्र, यानंतर केवळ चार मिनिटांनी जर्मनीला पेनल्टी किक मिळाली आणि ही संधी सत्कारणी लावत ज्युलियन ड्रॅक्सलरने जर्मनीला २-१ असे आघाडीवर नेले.
जर्मनीने मध्यंतराला हीच आघाडी कायम राखत नियंत्रण राखले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच जर्मनीच्या लिआॅन गोरेत्झका याने संघाचा तिसरा गोल साकारला. या जोरावर जर्मनीने आपली आघाडी ३-१ अशी भक्कम केली. मात्र, आठ मिनिटांनंतर टॉमी ज्युरिक याने अप्रतिम गोल केल्याने आॅस्टे्रलियाने २-३ अशी पिछाडी कमी केली. यावेळी आॅस्टे्रलिया अनपेक्षित निकाल लावणार अशी शक्यता होती.
मात्र, यानंतर जर्मनीने भक्कम बचावावर जोर देताना कोणताही अतिरिक्त धोका न पत्करता अखेरपर्यंत आघाडी कायम राखून विजयी सलामी दिली. (वृत्तसंस्था)