स्पर्धांचा अधिक अनुभव घ्या
By Admin | Published: July 1, 2017 02:11 AM2017-07-01T02:11:18+5:302017-07-01T02:11:18+5:30
अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव घेतल्याशिवाय चांगली कामगिरी करण्यासाठी टीप्स मिळणार नाहीत.
नवी दिल्ली : अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव घेतल्याशिवाय चांगली कामगिरी करण्यासाठी टीप्स मिळणार नाहीत. नियमितपणे अशा स्पर्धा खेळणार नसाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण वरचे स्थान गाठूच शकणार नाही. जागतिक स्तरावर यश मिळविण्यासाठी अधिक अनुभव घ्यावा लागेल, असा सल्ला लांब उडीतील माजी दिग्गज अंजू बॉबी जॉर्ज हिने दिला आहे.
२००३ च्या विश्व अॅथ्लेटिक्स स्पर्धेत कांस्य पदक विजेती एकमेव भारतीय खेळाडू अंजू म्हणाली, ‘अनेक भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आव्हान देण्याऐवजी सराव करण्यावर भर देतात. असे न करता यापुढे अमेरिका ंिकंवा युरोपातील खेळाडूंप्रमाणे अव्वल दर्जाच्या भारतीय खेळाडूंनी आपले मॅनेजर ठेवून व्यावसायिकता स्वीकारायला हवी.’
आमच्या वेळेच्या तुलनेत सध्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे. तथापि खेळाडू आधीच्या जुन्याच पद्धतीचा अवलंब करीत केवळ सरावावर भर देतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना पाठविले जात नाही. सरावातून ५० टक्के तयारी होते पण उरलेली तयारी ही स्पर्धात्मक वातावरणावर अवलंबून असते. ग्रॅण्डप्रिक्स किंवा डायमंड लीगसारख्या स्पर्धांमधील अनुभव भारतीय खेळाडूंना मिळायला हवा, असे मत अंजूने व्यक्त केले.
जागतिक स्तरावर यश मिळविण्यासाठी भारतीय खेळाडूंनी नेमके काय करायला हवे, हे समजावून सांगताना अंजू म्हणाली, ‘आम्ही कठोर मेहनत करण्यावर भर देतो. या बळावर विश्व स्पर्धा किंवा आॅलिम्पिकसाठी चढाओढ करतो. हा योग्य मार्ग नाही. यामुळे आॅलिम्पिक अथवा विश्व स्पर्धांमध्ये तुम्ही पदक जिंकू शकत नाही. अमेरिकन किंवा युरोपियन खेळाडूंचा दृष्टिकोन वेगळाच आहे. अव्वल दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यास पदकाचे अर्धे काम सोपे होते. मी स्वत: अमेरिका आणि युरोपातील स्पर्धांमध्ये वारंवार सहभागी झाल्याने त्या स्तरावर यशस्वी ठरू शकले.’
जागितक स्तरावरील स्पर्धांमधील प्रतिनिधित्वासाठी आर्थिक मदत कोण करणार असा सवाल करताच ती म्हणाली, ‘आर्थिक सहकार्य करणे सरकारची जबाबदारी आहे. अॅथ्लीटस् मात्र व्यावसायिकपणे खेळले पाहिजेत. व्यावसायिक खेळाडू असाल तर कोच आणि मॅनेजर यांना सर्व प्रकारची माहिती असायला हवी. प्रवास, सराव, वेळापत्रक हे आधीच तयार करण्याची जबाबदारी सहयोगी स्टाफची असते. व्यावसायिकपणा आणण्याचे काम क्रीडा महासंघ करणार नाही.
अमेरिका आणि युरोपातील अॅथ्लीटस् हे काम स्वत: करतात.’ अंजूने ज्युनियर स्तरावरील अॅथ्लीटस्ची फळी तयार करण्यावर भर दिला. यातूनच पुढे सिनियर स्तरावर चांगले खेळाडू पुढे येतील, असा विश्वास तिने व्यक्त केला. (वृत्तसंस्था)