आॅस्ट्रेलियाची पाकवर मात
By admin | Published: December 31, 2016 02:00 AM2016-12-31T02:00:46+5:302016-12-31T02:00:46+5:30
मिशेल स्टार्कच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी अखेरच्या दिवशी पाकिस्तानचा एक डाव व १८ धावांनी पराभव करीत तीन
मेलबोर्न : मिशेल स्टार्कच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी अखेरच्या दिवशी पाकिस्तानचा एक डाव व १८ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
वेगवान गोलंदाज स्टार्कने विक्रमी सात षट्कार ठोकत ९१ चेंडूंमध्ये ८४ धावांची खेळी केल्यानंतर ३६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेत आॅस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानचा दुसरा डाव ५३.२ षटकांत १६३ धावांत संपुष्टात आला. आॅफ स्पिनर नॅथन लियोनने ३३ धावांच्या मोबदल्यात ३, तर जोस हेजलवुडने ३९ धावांत २ बळी घेतले. पाकला पराभव टाळण्यासाठी किमान ७० षटके फलंदाजी करणे आवश्यक होते, पण त्यात ते अपयशी ठरले.
त्याआधी, कर्णधार स्टीव्हन स्मिथने उपाहारापूर्वी ८ बाद ६२४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित करीत निकालाच्या आशा पल्लवीत केल्या. पाकिस्तानने पहिला डाव ९ बाद ४४३ धावांवर घोषित केला होता. आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात १८१ धावांची आघाडी घेतली. सामनावीर स्मिथने २४६ चेंडूंना सामोरे जातना नाबाद १६५ धावांची खेळी केली. स्टार्कने मेलबोर्न क्रिकेट मैदानावर एका डावात सर्वाधिक ७ षट्कारांचा विक्रम नोंदवला. त्याने यासिर शाहला लक्ष्य करताना त्याच्याविरुद्ध पाच षट्कार ठोकले. स्टार्कने त्यानंतर गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करीत बाबर आजम, सरफराज अहमद, वहाब रियाज व यासिर यांना तंबूचा मार्ग दाखविला.
सिडनीमध्ये १९९५ मध्ये मिळवलेल्या विजयानंतर पाकिस्तानचा आॅस्ट्रेलियामध्ये हा सलग ११ वा कसोटी पराभव ठरला. त्याआधी, स्मिथ व स्टार्क यांनी सातव्या विकेटसाठी १७२ चेंडूंमध्ये १५४ धावांची भागीदारी केली. स्टार्कने ६९ चेंडूंमध्ये आठवे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. वैयक्तिक ५१ धावांवर सुदैवी ठरलेल्या स्टार्कने आक्रमक फलंदाजी केली. लियोन (१२) बाद झाल्यानंतर स्मिथने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. स्मिथने कारकिर्दीतील १७ वे आणि वर्षातील चौथे शतक १३ चौकार व १ षट्काराने सजवले. त्याने यंदा ७१.९३ च्या सरासरीने १०७९ धावा फटकावल्या.
पाकची दुसऱ्या डावात सुरुवात निराशाजनक झाली. आॅस्ट्रेलियाला उपाहारापूर्वी चार षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यात हेजलवुडने समी अस्लमला (२) माघारी परतवले. बाबर आजम (३), युनिस खान (२४), मिसबाह उलह-हक(००) आणि असद शफिक (१६) यांना मोठी खेळी करता आली नाही. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी पाकची ५ बाद ९१ अशी अवस्था होती. त्यानंतर हेजलवुडने पहिल्या डावात द्विशतकी खेळी करणाऱ्या अझहर अली (४३) याला बाद करीत मोठा अडथळा दूर केला. बडने मोहम्मद आमीर (११) आणि स्टार्कने सरफराज अहमद (४३) व वहाब रियाज (०) यांना माघारी परतवले. स्टार्कने त्यानंतर यासिर शाहला (०) तंबूचा मार्ग दाखवित विजय निश्चित केला. (वृत्तसंस्था)