गुलाबी चेंडूच्या सामन्यासाठी ईडन सज्ज
By admin | Published: June 17, 2016 05:27 AM2016-06-17T05:27:31+5:302016-06-17T05:27:31+5:30
भारतात पहिल्यांदा गुलाबी चेंडूच्या वापराने डे-नाईट क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचे यजमानपद भूषविण्यास ऐतिहासिक ईडन गार्डन सज्ज झाले.
कोलकाता : भारतात पहिल्यांदा गुलाबी चेंडूच्या वापराने डे-नाईट क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचे यजमानपद भूषविण्यास ऐतिहासिक ईडन गार्डन सज्ज झाले.
सुपरलीग स्पर्धेचा अंतिम सामना यंदा गुलाबी चेंडूने खेळविला जाईल. चार दिवसांचा हा डे-नाईट सामना १८ जूनपासून सुरू होईल. गुलाबी चेंडूने डे-नाईट सामना खेळविण्यावर जगभर सध्या वाद सुरू आहे. भारताने मात्र यात पुढाकार घेतला असून, चार दिवसांचा सामना प्रायोगिक तत्त्वावर खेळविण्यावर भर दिला.
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अॅडिलेड मैदानावर जगातील पहिला डे-नाईट आंतरराष्ट्रीय वन डे खेळविण्यात आला. हा सामना आॅस्ट्रेलियाने जिंकला होता. बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरभ गांगुली याच्या नेतृत्वात आॅस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डीन जोन्स, भारताचा माजी कलात्मक फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण आणि समालोचक हर्षा भोगले यांनी गुरुवारी झालेल्या एका चर्चेत भाग घेतला. या चर्चेत गुलाबी चेंडूच्या वापरामुळे होणारे लाभ आणि हाणी या दोन्ही पैलूंवर मत मांडण्यात आले.
या चर्चेअंती गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळणे हे भविष्यासाठी लाभदायी असेल, असे मत व्यक्त करण्यात आले. गुलाबी चेंडूमुळे कसोटी क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल होतील, अशी अपेक्षा सौरव गांगुली याने व्यक्त केली.
देशात प्रथमच दिवस-रात्रीचा कसोटी सामना गुलाबी
चेंडूने खेळविण्याबाबत बीसीसीआयच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. बीसीसीआयचे निर्देश आल्यानंतरच न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात दिवस-रात्रीचा कसोटी सामना होतो किंवा नाही हे निश्चित होईल.
- सौरव गांगुली
गेल्या दशकापासून फलंदाजांना पूरक नियम बनले. पण गुलाबी चेंडूमुळे सामना बरोबरीचा असेल. हा चेंडू अधिक स्विंग होईल. हा चेंडू डोळ्याने पाहतानादेखील कुठली अडचण येत नाही. लोकांना मैदानाकडे ओढण्यासाठी गुलाबी चेंडूचा वापर हे मार्केटिंग ठरावे.
- डीन जोन्स
गुलाबी चेंडू फिरकीपटूंकडून तपासून घ्यावा. आश्विनसारख्या फिरकी गोलंदाजाकडून हा चेंडू किती टर्न होतो हे पाहावे लागेल. ५० षटकांच्या सामन्यात हा चेंडू रंगहीन होण्याची भीती आहे. शिवाय चेंडू थोडा नरम झाल्याने गोलंदाजांच्या बोटांना अवघडल्यासारखे वाटू शकते. तरीही गोलंदाज यावर उपाय शोधतील.
- व्हीव्हीएस लक्ष्मण