घानाची द. कोरियाला मजबूत किक, विजयासह कायम राखल्या आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 12:16 PM2022-11-29T12:16:38+5:302022-11-29T12:17:13+5:30
विजयासह कायम राखल्या आशा
अल रयान (कतार) : जागतिक क्रमवारीत ६१व्या स्थानी असलेल्या घाना संघाने धक्कादायक विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत २८व्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियाला ३-२ असा धक्का दिला. या दिमाखदार विजयासह घानाने ह गटातून फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. तसेच, दक्षिण कोरियाची वाटचाल आता बिकट झाली असून, त्यांना स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी आपल्या अखेरच्या सामन्यात बलाढ्य उरुग्वेला नमवावेच लागेल.
एज्युकेशन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात घानाने सुरुवातीपासून दमदार खेळ करत कोरियन संघाला झुंजवले. सलामीला तगड्या पोर्तुगालला विजयासाठी झुंजविल्यानंतर घानाचा आत्मविश्वास अधिक उंचावला होता. मोहम्मद कुडूसने दोन गोल करत घानाकडून निर्णायक खेळ केला. मोहम्मद सलिसू याने २४व्या मिनिटाला गोल करत घानाला १-० अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर कुडुसने ३४व्या मिनिटाला गोल करत घानाला मध्यंतराला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात मात्र कोरियन खेळाडूंनी जबरदस्त मुसंडी मारली. चो ग्यु-सुंग याने तीन मिनिटांत दोन अप्रतिम हेडरद्वारे ५८व्या आणि ६१व्या मिनिटाला गोल करत दक्षिण कोरियाला २-२ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली. यावेळी कोरिया बाजी मारणार असे दिसत असताना पुन्हा एकदा कुडुसने ६८व्या मिनिटाला निर्णायक गोल करत घानाला ३-२ आघाडीवर नेले. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखत घानाने बाजी मारली.
प्रशिक्षकांना ‘रेड कार्ड’
सामना संपल्यानंतर नाट्यमय प्रसंग घडले. निर्धारी ९० मिनिटांच्या खेळानंतर सामन्यात १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. यावेळी अंतिम क्षणी कोरियाने पेनल्टी कॉर्नर मिळवला होता, मात्र त्याचवेळी रेफ्रींनी सामना सपल्याचे जाहीर केले. यावर कोरियाच्या भडकलेले प्रशिक्षक पावलो बेंटो यांनी थेट मैदानावर धाव घेत रेफ्रींशी हुज्जत घातली. यावर रेफ्रींनी त्यांना रेड कार्ड दाखवले. यामुळे आता पोर्तुगालविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यासाठी बेंटो आपल्या संघासोबत मैदानात उपस्थित राहू शकणार नाही.
घानाच्या मोहम्मद कुडोसने केलेले दोन मैदानी गोल विजयातील अंतर स्पष्ट करणारे ठरले.
विश्वचषक सामन्यात दोन गोल करणारा २२ वर्षीय मोहम्मद कुडुस हा नायजेरियाच्या अहमेद मुसानंतरचा (२१ वर्ष, २०१४) दुसरा आफ्रिकन युवा खेळाडू ठरला.
विश्वचषक सामन्यात घानाने पहिल्यांदाच तीन गोल केले.
सलग आठव्या विश्वचषक सामन्यात घानाने गोल करण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा पहिला आफ्रिकन संघ.