विंडीजपुढे ‘जायंट किलर’ आयर्लंडचे आव्हान

By admin | Published: February 16, 2015 02:55 AM2015-02-16T02:55:45+5:302015-02-16T02:55:45+5:30

धक्कादायक निकाल नोंदविण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘जायंट किलर’ आयर्लंडला विश्वकप स्पर्धेत सोमवारी वेस्ट इंडिज संघाच्या आव्हानाला

'Giant Killer' Ireland challenge before Windies | विंडीजपुढे ‘जायंट किलर’ आयर्लंडचे आव्हान

विंडीजपुढे ‘जायंट किलर’ आयर्लंडचे आव्हान

Next

नेल्सन : धक्कादायक निकाल नोंदविण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘जायंट किलर’ आयर्लंडला विश्वकप स्पर्धेत सोमवारी वेस्ट इंडिज संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघांत प्रतिभावान फलंदाजांचा समावेश आहे, पण गोलंदाजी उभय संघांसाठी चिंतेचा विषय आहे.
२०११ च्या विश्वकप स्पर्धेत आयर्लंडने इंग्लंडचा पराभव केला होता; तर त्याआधी चार वर्षांपूर्वी आयर्लंडने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला होता. आयर्लंडने विश्वकप स्पर्धेपूर्वी मानांकनामध्ये नवव्या स्थानावर असलेल्या बांगलादेशविरुद्ध विजय नोंदविला होता. बांगलादेश संघ मानांकनामध्ये विंडीजपेक्षा एका स्थानाने खाली आहे.
आयर्लंडने या लढतीत चार गडी राखून सरशी साधली होती. वेगवान गोलंदाज जॉन मुनी व मॅक्स सोरेन्सेन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले होते; तर अ‍ॅन्डी बालबर्नीने नाबाद ६३ धावांची खेळी केली होती.
वेस्ट इंडिजला गेल्या आठवड्यात सराव सामन्यात इंग्लंडविरुद्ध ९ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. कॅरेबियन संघाचा डाव २९.३ षटकांत १२२ धावांत संपुष्टात आला होता. दुसऱ्या सराव सामन्यात विंडीजने स्कॉटलंडविरुद्ध तीन चेंडू राखून संघर्षपूर्ण विजय मिळविला होता.
दुसऱ्या बाजूचा विचार करता आयर्लंडची फलंदाजीमध्ये भिस्त केव्हिन ओब्रायनच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
त्याने चार वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध ५० चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. आयर्लंड संघात नील ओब्रायन, विलियम पोर्टरफिल्ड आणि अ‍ॅड जॉयस यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. गोलंदाजीमध्ये अनुभवाची उणीव भासत आहे, पण क्रेग यंगने पाच महिन्यांपूर्वी स्कॉटलंडविरुद्ध पदार्पणाच्या लढतीत पाच बळी घेतले होते. त्याच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Giant Killer' Ireland challenge before Windies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.