‘जायंट किलर’ कोरियाचा सलग दुसरा विजय

By admin | Published: October 10, 2016 04:16 AM2016-10-10T04:16:37+5:302016-10-10T04:16:37+5:30

सलामीला बलाढ्य व संभाव्य विजेत्या भारतीय संघाला नमवण्याचा पराक्रम करून ‘जायंट किलर’ ठरलेल्या कोरियाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा

'Giant Killer' second consecutive win in Korea | ‘जायंट किलर’ कोरियाचा सलग दुसरा विजय

‘जायंट किलर’ कोरियाचा सलग दुसरा विजय

Next

अहमदाबाद : सलामीला बलाढ्य व संभाव्य विजेत्या भारतीय संघाला नमवण्याचा पराक्रम करून ‘जायंट किलर’ ठरलेल्या कोरियाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवताना अर्जेंटिनाला ६८-४२ असे नमवले. या शानदार विजयासह कोरियाने १० गुणांसह ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले. तर, भारत ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
कोरियाने अपेक्षेप्रमाणे आक्रमक सुरुवात करताना अर्जेंटिनाला दबावाखाली ठेवले. कोरियाच्या वेगवान आणि चपळ खेळापुढे हतबल झालेल्या अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडून अनेक चुका झाल्या. या जोरावर कोरियाने मोठी आघाडी घेत मध्यांतराला ४३-११ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले.
परंतु, दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनाने पुनरागमनाचा चांगला प्रयत्न केला. त्यांनी चढाई आणि पकडीमध्ये चांगले प्रदर्शन करताना एकवेळ कोरियाला गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनुभवाच्या जोरावर कोरियाने उत्कृष्ट खेळ करताना अर्जेंटिनाला अखेरपर्यंत डोके वर काढू दिले नाही.
कोरियाने नियोजनबद्ध खेळाच्या जोरावर अननुभवी असलेल्या अर्जेंटिनावर तब्बल ५ लोण चढवले. त्याचवेळी, दुसऱ्या सत्रात आक्रमक पवित्रा घेतलेल्या अर्जेंटिनाने दोनवेळा लोण चढवून पुनरागमनाचा अपयशी प्रयत्न केला. त्या मानाने चढाईमध्ये अर्जेंटिनाने चांगली कामगिरी केली. त्यांनी २९ गुण चढाईमध्ये कमावताना बचावामध्ये केवळ ९ गुण मिळवले. दुसरीकडे कोरियाने ३६ गुण चढाईमध्ये जिंकताना बचावामध्ये १६ गुण कमावून बाजी मारली.
भारताविरुद्ध कोरियाचा हीरो ठरलेल्या जँग कून ली याने या वेळी इतर खेळाडूंना संधी देताना ४ गुण मिळवले. तर, चेओल ग्यू शिन आणि ताइ बेओम किम यांनी खोलवर चढाया करताना अनुक्रमे ९ व ७ गुण कमावले. त्याचवेळी चान सिक पार्क, जाइ मिन ली आणि ग्यूंग ताइ किम या त्रिकूटाने भक्कम बचाव करत अर्जेंटिनाची हवा काढली. पराभूत संघाकडून फ्रँको कास्ट्रो (१०), नेहूएल विल्लमेयर (८) आणि युजेनियो पीटरमन (७) यांनी अपयशी झुंज दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Giant Killer' second consecutive win in Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.