दिग्गज मेरीकोमची सहजपणे उपांत्यपूर्व फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 05:28 AM2019-10-09T05:28:13+5:302019-10-09T05:28:28+5:30
भारताची अनुभवी बॉक्सर मेरीकोमने सहज बाजी मारताना थायलंडच्या जुटामास जिटपोंग हिचा ५-० असा धुव्वा उडवला.
उलान उदे (रशिया) : सहा वेळची विश्वविजेती दिग्गज बॉक्सर एमसी मेरीकोम हिने ५१ किलो गटातून मंगळवारी अपेक्षित कामगिरी करताना महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी दुसरीकडे भारताची अन्य बॉक्सर स्वीटी बूरा हिला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
भारताची अनुभवी बॉक्सर मेरीकोमने सहज बाजी मारताना थायलंडच्या जुटामास जिटपोंग हिचा ५-० असा धुव्वा उडवला. दरम्यान, सामना एकतर्फी रंगलेला दिसत असला, तरी जिटपोंगने शानदार खेळ करताना ३६ वर्षीय मेरीकोमविरुद्ध कडवी झुंज दिली. तिने काही आक्रमक ठोसे मारताना मेरीकोमला अनेकदा गोंधळवलेही, परंतु तरीही जिटपोंगला बलाढ्य मेरीकोमविरुद्ध गुण घेण्यात यश आले नाही. स्पर्धेत तिसरे मानांकन मिळालेल्या मेरीकोमला पहिल्या फेरीत बाय मिळाला. यानंतरच्या लढतीत मेरीकोमने सावध सुरुवात करताना पहिल्या तीन मिनिटांपर्यंत जिटपोंगच्या खेळाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मात्र मेरीकोमने आक्रमक पवित्र घेताना जिटपोंगला कोणतीही संधी दिली नाही.
७५ किलो गटामध्ये भारताला मोठा धक्का बसला. माजी जागतिक रौप्य पदक विजेती स्वीटी बूराला दुसºया मानांकित लॉरेन प्राइसविरुद्ध १-३ असा पराभव पत्करावा लागला. प्राइस युरोपीयन अजिंक्यपद स्पर्धेची विजेती असून, गेल्या जागतिक स्पर्धेत तिने सुवर्ण जिंकले होते. प्राइस विद्यमान राष्ट्रकूल चॅम्पियनही
आहे. प्राइसचा सध्याचा जागतिक फॉर्म पाहता स्वीटीपुढे तगडे आव्हान होते.
खंबीरपणे प्राइसच्या आव्हानाला सामोरे गेलेल्या स्वीटीने आपला सर्वोत्तम खेळ केला. तिने अनेक आश्वासक ठोसे लगावताना छापही पाडली. आक्रमक सुरुवात केलेल्या स्वीटीने सामन्यावर पकड मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही. अखेर प्रशिक्षकांचा निर्णय प्राइसच्या बाजूने लागला आणि स्वीटीचे आव्हान संपुष्टात आले.