टल्ली असतानाच गिब्जने केली होती ऑस्ट्रेलियाची पिटाई
By Admin | Published: March 13, 2017 04:47 PM2017-03-13T16:47:23+5:302017-03-13T16:47:23+5:30
क्रिकेटपटूंच्या मद्यपानाबाबचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण एखाद्या क्रिकेटपटूने मनसोक्त मद्यपान केल्यानंतर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - क्रिकेटपटूंच्या मद्यपानाबाबचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण एखाद्या क्रिकेटपटूने मनसोक्त मद्यपान केल्यानंतर मैदानात येत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची तुफान धुलाई केल्याचे कधी ऐकलेय का? अशी घटना क्रिकेटमध्ये एकदा घडली आहे. 2006 साली ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेला पाचवा एकदिवसीय सामन्याबाबत तुम्हाला माहितीच असेल. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 434 धावांचा यशस्वी पाठलाग करत इतिहास रचला होता. हर्षेल गिब्जने केलेली 175 धावांची झंझावाती खेळी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात निर्णायक ठरली होती. आता गिब्जने त्या खेळीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
ती खेळी करताना आपण दारूच्या नशेत होतो असा गौप्यस्फोट गिब्जने केला आहे. गिब्ज त्या खेळीची आठवण जागवताना म्हणतो, "ती खेळी करण्याआधी आदल्या रात्री मी प्रचंड मद्यपान केले होते. सामना सुरू असतानाही माझ्यावरील दारुचा अंमल उतरला नव्हता." मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गिब्ज आणि स्मिथने दक्षिण आफ्रिकेला जोरदार सुरुवात दिली होती. त्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा संघ तो सामना दोन गडी राखून जिंकण्यात यशस्वी ठरला होता. गिब्जने त्या ऐतिहासिक सामन्यात 111 चेंडूत 175 धावा कुटल्या होत्या. त्या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.