जिद्दीच्या बळावर घातली गिरीशिखराला गवसणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 05:37 AM2019-05-19T05:37:49+5:302019-05-19T05:37:53+5:30
जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर । माउंट मकालू सर करणारी देशातील पहिली महिला
कुलदीप घायवट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर असलेले माउंट मकालू सर करणारी देशातील पहिली महिला गिर्यारोहक प्रियांका मोहिते ठरली आहे. नेपाळ व चीन देशांच्या हद्दीवरील ८ हजार ४६३ मीटर उंचीचे हे हिमशिखर प्रियांकाने वयाच्या २६व्या वर्षी सर केले. या कामगिरीमुळे प्रियांकाचे देशभरातून कौतुक होत आहे.
१८ एप्रिल, २०१९ रोजी माउंट मकालू चढण्यास प्रियांकाने सुरुवात केली. हे शिखर सर करण्यासाठी नेपाळच्या एका ग्रुपने जगातील २२ सदस्यांची निवड केली होती, त्यात प्रियांका होती. तिच्यासोबत लाखपा शेर्पा होता. १५ मे, २०१९ रोजी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास तिने मकालू शिखर पार करून तेथे भारताचा तिरंगा फडकाविला. या आधीने तिने एव्हरेस्ट, ल्होत्से, माउंट किलीमांजारो, माउंट एलब्रुस ही जागतिक दर्जाची हिमशिखरे पार केली आहेत.
जगात ८ हजार मीटर उंचीची १४ शिखरे आहेत. नेपाळ आणि चीन या दोन देशांच्या सीमेवर असलेले माउंट मकालू हे यातील पाचव्या क्रमांकाचे शिखर आहे. माउंट मकालूची रचना पिरॅमिडसारखी आहे. या ठिकाणी ताशी पंच्चाहत्तर मैल वेगाने वारे वाहतात. त्यामुळे यावर चढाई करणे आव्हानात्मक आहे.
शेवटचा टप्पा खडकाळ असल्याने तो पार करणे अवघड होते. मात्र, जिद्दीने ८ हजार ४६३ मीटरचे माउंट मकालू सर करत, हे शिखर पार करणारी ती देशातील पहिली महिला व कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे.
मागील वर्षी ल्होत्से शिखर पार केल्यानंतर मकालू किंवा मनसलू शिखर सर करण्याचा मानस होता. त्यामुळे मकालू पार केल्याचे समाधान वाटत आहे. आता जगातील ८ हजारपेक्षा जास्त उंचीची शिखरे पार करण्याचे ध्येय आहे, असे प्रियांकाने सांगितले.
‘शिवछत्रपती’ पुरस्काराने सन्मान
च्मूळची साताऱ्याची असलेल्या प्रियांका मोहिते हिने २०१३ साली सर्वाेच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८ हजार ८५० मीटर) सर केले. त्यानंतर, १६ मे, २०१८ रोजी जगातील चौथ्या क्रमांकाचे अत्युच्च आणि अत्यंत अवघड हिमशिखर माउंट ल्होत्से (८ हजार ५१६ मीटर) यशस्वीरीत्या सर केले.
च्प्रियांकाने बीएससीचे शिक्षण घेतले आहे. गिर्यारोहनाची आवड असलेल्या प्रियांकाने सर्वाेच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आणि माउंट ल्होत्से सर केल्याच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र शासनानेही घेतली आहे. नुकताच तिला ‘शिवछत्रपती’ पुरस्कार प्रदान करून शासनाने तिच्या विक्रमाचा सन्मान केला आहे.