गीताच्या आईला हवा होता मुलगा
By admin | Published: December 22, 2016 12:19 AM2016-12-22T00:19:40+5:302016-12-22T00:19:40+5:30
भारताची स्टार महिला मल्ल गीता फोगट हिचे मार्गदर्शक व वडील महावीर फोगट यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाची सध्या
नवी दिल्ली : भारताची स्टार महिला मल्ल गीता फोगट हिचे मार्गदर्शक व वडील महावीर फोगट यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे यामध्ये नमूद केल्यानुसार गीताच्या जन्मानंतर तिची आई निराश झाली होती. कारण त्यांना मुलगा हवा होता. फोगट यांच्यावरील पुस्तकामध्ये असे नमूद केले असल्याने सध्या याची खूप चर्चा आहे.
या पुस्तकामध्ये म्हटले आहे की, जेव्हा महावीर यांना आपले पहिले अपत्य मुलगी असल्याचे कळाले तेव्हा ते निराश झाले नाहीत; परंतु गीताची आई निराश झाली होती. ही गोष्ट १९८८ सालची आहे. परंतु, गीताने आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरविताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. ७ आॅक्टोबर २०१० साली गीताने आॅस्टे्रलियाच्या एमिली बेन्स्टेडला लोळवून राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पटकाविणारी पहिली भारतीय महिला असा इतिहास रचला. दखल घेण्याची बाब म्हणजे, स्त्री-भ्रूणहत्येसाठी कुप्रसिद्ध असलेल्या हरियाणा राज्याची गीता असल्याने तिने केलेला पराक्रम विशेष ठरतो.
या पुस्तकात म्हटले आहे की, ‘१९८८ सालची तो थंडीतील सकाळचा दिवस होता, जेव्हा महावीर आपल्या मुलीच्या जन्माची बातमी गर्वाने सांगत होते. त्या दिवशी त्यांनी गीताला आपल्या कुशीत घेऊन घोषणा केली होती की, ही मुलगी एक दिवस परिवाराचे नाव उंचावेल.’ महावीर यांनी कशाप्रकारे अनेक अडचणींना सामोरे जात आपल्या दोन्ही मुली आॅलिम्पियन गीता आणि बबिता कुमारी यांना घडविले याची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
पुस्तकात लिहिण्यात आले आहे की, ‘कोणीही महावीर यांच्या मनाची स्थिती समजू शकतं. ते ८०च्या अशा दशकात मुलीचे वडील झाले होते, जेव्हा मुलीला ओझं मानलं जायचे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे पहिले अपत्य मुलगा व्हावे, अशी अपेक्षा महावीर यांची कधीच नव्हती, तर ती अपेक्षा त्यांची पत्नी दया कौर यांची होती.’ (वृत्तसंस्था)