ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ द्या
By admin | Published: May 6, 2016 05:09 AM2016-05-06T05:09:26+5:302016-05-06T05:09:26+5:30
हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने गौरविण्याची मागणी जुनीच आहे. वर्षानुवर्षे ही मागणी केली जात आहे. संसदेपासून मैदानापर्यंत चर्चा रंगते
नवी दिल्ली : हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने गौरविण्याची मागणी जुनीच आहे. वर्षानुवर्षे ही मागणी केली जात आहे. संसदेपासून मैदानापर्यंत चर्चा रंगते; पण ध्यानचंद यांचा सर्वोच्च सन्मान राहून जातो.
सचिन तेंडुलकरला हा नागरी सन्मान मिळाला, त्या वेळी ध्यानचंद यांना आधी हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्याची मागणी जोर धरूलागली होती; पण ध्यानचंद तेव्हा देखील दुर्लक्षित राहिले. गुरुवारी राज्यसभेत विविध पक्षाच्या सदस्यांनी हॉकीच्या या सर्वकालीन महान खेळाडूला ‘भारतरत्न’ने गौरविण्याची एकमुखी मागणी केली.
समाजवादी पक्षाचे चंद्रपालसिंग यादव यांनी हा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, झाशीत जन्मलेले ध्यानचंद भारतीय हॉकीला सुवर्णयुगात घेऊन गेले. त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ अशी सलग तीन आॅलिम्पिक सुवर्णपदके जिंकून दिली. ४८ सामन्यांत १०९ गोल करण्याचा त्यांचा विक्रम आजही अबाधित आहे. दुसऱ्या राष्ट्रांनी मोठ्या रकमेचे आमिष देत ध्यानचंद यांना कोच बनण्याची वारंवार विनंती केली; पण महान देशभक्त असलेल्या या खेळाडूने कधीही ती आॅफर स्वीकारली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनीदेखील ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. याकडे लक्ष वेधून यादव पुढे म्हणाले, ‘मोदी यांनी स्वत:ची मागणी पूर्ण करण्याची ही योग्य वेळ आहे.’ भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि बिजू जनता दलाचे सदस्य दिलीप तिर्की यांनी यादव यांच्या मागणीला पाठिंबा देत स्मरण दिले की, आधीदेखील दोन्ही सभागृहात वारंवार ही मागणी करण्यात आली. (वृत्तसंस्था)