‘बेंच स्ट्रेंथ’ला संधी देणार
By admin | Published: March 3, 2016 04:16 AM2016-03-03T04:16:57+5:302016-03-03T04:16:57+5:30
विजयाची हॅट्ट्रिक साधल्याने आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज गुरुवारी कमकुवत संयुक्तअरब अमिरातविरुद्ध अखेरच्या साखळी लढतीत राखीव
मीरपूर : विजयाची हॅट्ट्रिक साधल्याने आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज गुरुवारी कमकुवत संयुक्तअरब अमिरातविरुद्ध अखेरच्या साखळी लढतीत राखीव खेळाडूंना ‘दम’ दाखविण्याची संधी देण्याच्या विचारात आहे.
कर्णधार महेंद्रसिंह धोनी संघात अधिक बदल पसंत करीत नाही; पण लंकेविरुद्ध पाच गड्यांनी विजय नोंदविल्यानंतर कालच त्याने राखीव खेळाडूंना पुढच्या सामन्यात संधी देण्याचे संकेत दिले होते. याचा अर्थ असा की अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग, पवन नेगी, भुवनेश्वर कुमार यांच्यापैकी किमान दोघातिघांना संधी दिली जाईल. संघात फारसा बदल राहणार नाही, पण दोन किंवा तीन नवे चेहरे असतील, असे धोनीने सांगितले. रहाणेला शिखर धवनऐवजी तर भुवनेश्वरला नेहराऐवजी खेळविले जाईल. महिनाभरात नऊ टी-२० सामने खेळणाऱ्या नेहराला विश्रांती दिली जाईल. भुवनेश्वर वन डे विश्वचषकानंतर वर्षभरापासून संघाबाहेर आहे. त्याने स्विंगमधील लय गमावली, पण यूएईसारख्या कमकुवत संघाविरुद्ध त्याला ही लय परत मिळविण्याची चांगली संधी राहील. हरभजन आणि पवन नेगी हे दोन्ही फिरकीपटू आश्विन तसेच जडेजा यांचे स्थान घेऊ शकतात. आयपीएल लिलावात सर्वाधिक महागडा ठरलेल्या पवन नेगीला आशिया चषकात सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
यूएई संघ गोलंदाजीत चांगलाच आहे. अमजद जावेद याच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी माऱ्याने प्रतिस्पर्धी संघाला सुरुवातीला धक्के दिले होते. पण लंका, बांगलादेश आणि पाकच्या तुलनेत भारतीय फलंदाजी भक्कम आहे. त्यामुळे यूएईविरुद्धचा हा सामना भारतासाठी सराव सामन्यासारखाच असेल.
> सामना : सायंकाळी ७ वाजेपासून
> भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग, हार्दिक पंड्या, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, आशिष नेहरा, जसप्रीत बुमरा, पवन नेगी, हरभजनसिंग, अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार, पार्थिव पटेल.
संयुक्त अरब अमिरात : अमजद जावेद (कर्णधार), अहमद रजा, मोहम्मद नावेद, मोहम्मद शहजाद, मोहम्मद कलीम, मोहम्मद उस्मान, स्वप्निल पाटील, कादिर अहमद, रोहन मुस्तफा, सकलेन हैदर, शैमान अन्वर, उस्मान मुश्ताक, जहीर मकसूद.