सल्लागार म्हणून सचिन तेंडुलकर द्या, रवी शास्त्रींची आणखी एक मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:07 PM2017-07-19T15:07:46+5:302017-07-19T15:38:43+5:30
गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरूण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर हा आपल्या आवडीचा स्टाफ मिळाल्यानंतरही
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - टीम इंडियाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मागण्या कही संपताना दिसत नाहीत. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरूण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर हा आपल्या आवडीचा स्टाफ मिळाल्यानंतरही शास्त्रींनी एक नवी इच्छा व्यक्त केल्याचं वृत्त आहे. भारताचा महान क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरची टीम इंडियाचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची इच्छा शास्त्रींनी व्यक्त केली आहे.
रवी शास्त्री यांनी बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के.खन्ना, सीईओ राहुल जोहरी, कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी आणि प्रशासक समिती सदस्य डायना एडलजी यांच्यासमवेत झालेल्या विशेष सभेमध्ये ही इच्छा व्यक्त केली. सचिन तेंडुलकरची नियुक्ती करताना हितसंबंधांची टक्कर होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल असं शास्त्री म्हणाले. सचिन तेंडुलकर सध्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आहे. याच समितीने रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुक्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे.
यापुर्वी नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मागणी मान्य करताना बीसीसीआयने मंगळवारी भरत अरुण यांची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली होती. त्यामुळे या पदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. शास्त्री भारतीय संघाचे संचालक होते त्या वेळी अरुण गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी लवकरच सुरू होत असलेल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अरुण यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याचा आग्रह धरला होता.
अरुण यांना दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्याचा निर्णय शास्त्री यांच्या प्रशासकांची समिती (सीओए) तसेच काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांच्यासह बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबतच्या मुलाखतीनंतर घेण्यात आला.
(रवी शास्त्रींचा दबदबा ! भरत अरूण टीम इंडियाचे नवे बॉलिंग कोच )