मिठाईचा त्याग अन् अनेक रात्री जागरण! सुमित अंतिलच्या सुवर्णामागची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 06:37 AM2024-09-04T06:37:45+5:302024-09-04T06:38:08+5:30
Sumit Antil: दीर्घ काळापासून पाठदुखीने त्रस्त असलेला भारताचा पॅरा भालाफेकपटू सुमित अंतिल याच्या पॅरिस पॅरालिम्पिकमधील सुवर्ण पदकामागे त्यागाची मोठी कहाणी आहे. त्यात मिठाईचा त्याग आणि अनेक रात्रींच्या जागरणाचाही समावेश आहे.
पॅरिस - दीर्घ काळापासून पाठदुखीने त्रस्त असलेला भारताचा पॅरा भालाफेकपटू सुमित अंतिल याच्या पॅरिस पॅरालिम्पिकमधील सुवर्ण पदकामागे त्यागाची मोठी कहाणी आहे. त्यात मिठाईचा त्याग आणि अनेक रात्रींच्या जागरणाचाही समावेश आहे.
पॅरालिम्पिकआधी झपाट्याने वजन वाढण्याच्या आव्हानामुळे सुमितला आपल्या आवडत्या मिठाईचा त्याग करावा लागला. त्याशिवाय गतवर्षी हांगझोऊ पॅरा आशियाई स्पर्धेत कंबरेला झालेली दुखापत त्रस्त करत होती. फिजिओच्या सल्ल्याने सुमितने मिठाई खाणे बंद केले आणि आहार नियंत्रित केला. त्याने दोन महिन्यांत १२ किलो वजन कमी केले. पॅरालिम्पिक विजेतेपद राखणारा तो दुसरा भारतीय खेळाडू बनला, तेव्हा त्याच्या मेहनतीला फळ मिळाले. त्याने पॅरालिम्पिकमध्ये ७०.५९ मीटरचा नवा विक्रमही नोंदवला.
सुमित म्हणाला की, ‘मी १० ते १२ किलो वजन कमी केले. माझे फिजिओ विपिन भाई यांनी सांगितले की, वजनामुळे मणक्यावर दबाव पडत आहे. त्यामुळे मी गोड खाणे बंद केले. योग्य आहार घेण्यावर भर दिला. मी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हतो. मला भाला फेकण्याआधी पेनकिलर गोळी घ्यावी लागली. सरावादरम्यान मी सर्वोत्तम स्थितीत नव्हतो.’
सुमित पुढे म्हणाला की, ‘सगळ्यात आधी मला कंबरेवर उपचार घ्यायचे आहेत. दुखापत मोठी होऊ नये यासाठी मी खूप जपून खेळलो. तंदुरुस्तीसाठी मी व्यायामही सुरू केला आहे. प्रशिक्षक अरुण कुमार यांच्यासोबत मला दोन वर्षे झाली आहेत. मला कधी आणि काय हवे आहे ते त्यांना माहीत आहे. मी त्यांना रात्रभर जागून रणनीती तयार करताना पाहिले आहे.’