एकताची चमक, भारत अंतिम फेरीत
By admin | Published: February 20, 2017 12:33 AM2017-02-20T00:33:02+5:302017-02-20T00:33:02+5:30
डावखुरी फिरकीपटू एकता बिष्टने कारकिर्दीतील केलेल्या सर्वोत्तम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा
कोलंबो : डावखुरी फिरकीपटू एकता बिष्टने कारकिर्दीतील केलेल्या सर्वोत्तम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १६५ चेंडू व ७ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी महिला विश्वकप क्वालिफायरमध्ये अपराजित राहताना अंतिम फेरीत स्थान मिळवले.
इंग्लंडमध्ये यंदा जून-जुलैमध्ये होणाऱ्या महिला विश्वकप स्पर्धेत यापूर्वीच स्थान निश्चित करणाऱ्या भारतीय महिला संघाने लीग व सुपर सिक्समध्ये आपले सर्व सामने जिंकत अव्वल संघ म्हणून अंतिम फेरी गाठली.
एकताने १० षटकांत ८ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. ही तिची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. दरम्यान, वन-डे क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारी ती नववी भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे. एकताला शिखा पांडे (९ धावांत २ बळी) हिची योग्य साथ लाभली. भारताने पाकिस्तानचा डाव ४३.४ षटकांत ६७ धावांत गुंडाळला. पाकिस्तानची भारताविरुद्ध ही दुसरी नीचांकी धावसंख्या ठरली आहे.
भारताने २२.३ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात ७० धावा फटकावत विजय साकारला. दीप्ती शर्मा २९ धावा काढून नाबाद होती, तर हरमनप्रीत कौरने २४ धावांची खेळी केली. वेदा कृष्णमूर्तीने (नाबाद ४) विजयी फटका लगावला. पाकिस्तानतर्फे सादिया युसूफने दोन बळी घेतले.
त्याआधी, मिताली राजने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मध्यमगती गोलंदाज शिखा पांडेने प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या फळीला धक्के दिल्यानंतर एकताने त्यांचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानतर्फे आयेशा जफर (१९) व बिस्माह मारुफ (१३) यांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. अवांतर धावांच्या साहाय्याने पाकिस्तानला अर्धशतकाची वेस ओलांडता आली. त्यांच्या धावसंख्येत २४ अवांतर धावांचा समावेश आहे. त्यात १३ वाईड चेंडूंचा समावेश आहे. भारतातर्फे एकता व शिखा यांच्याव्यतिरिक्त हरमनप्रीत, दीप्ती शर्मा व देविका वैद्य यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)