‘गोल्डन गर्ल’ भक्तीचा गोवा क्रीडा खात्याला विसर, सरकार ‘इफ्फी’त दंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 04:19 PM2018-11-29T16:19:17+5:302018-11-29T16:25:45+5:30

राज्यासाठी अभिमानास्पद कामगिरी करून गौरव मिळवून देणाऱ्या पहिल्या महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णीच्या कामगिरीचा विसर गोवा शासनाला पडल्याचे बुधवारी दिसून आले.

Goa Sports Department forgot to welcome chess star Bhakti Kulkarni | ‘गोल्डन गर्ल’ भक्तीचा गोवा क्रीडा खात्याला विसर, सरकार ‘इफ्फी’त दंग 

दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर आई-वडील व मैत्रीण श्रेयस- समवेत राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा विजेती भक्ती कुलकर्णी.

googlenewsNext

- सचिन कोरडे 
पणजी : एखादा खेळाडू राष्ट्रीय पातळीवर राज्याचे नाव झळकवतो, तेव्हा त्याचा मोठा गाजावाजा केला जातो. त्याला डोक्यावर घेतले जाते; कारण ती राज्याची ओळख बनते. मात्र, राज्यासाठी अभिमानास्पद कामगिरी करून गौरव मिळवून देणाऱ्या पहिल्या महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णीच्या कामगिरीचा विसर गोवा शासनाला पडल्याचे बुधवारी दिसून आले. 


इफ्फीच्या समारोपात सरकार दंग होते. अशात जयपूर येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकाविणाऱ्या भक्तीचे गोव्यात आगमन झाले. दाबोळी विमानतळावर तिचे शासकीय पातळीवर स्वागत होणे सर्वांनाच अपेक्षित होते. मात्र, शासनाचा किंबहुना बुद्धिबळ संघटनेचा एकही अधिकारी विमानतळावर फिरकला नाही. आपले जल्लोषी स्वागत होईल, अशी कल्पनाही भक्तीने केली असेल. मात्र, तिच्या या अभूतपूर्व कामगिरीची कदर करणारा कुणीही तेथे उपस्थित नव्हता. आपल्या मुलीच्या कामगिरीचा अभिमान असलेल्या आई-वडिलांचे डोळे मात्र याप्रसंगी पाणावले होते. त्यांनीच तिचे गहिवरून स्वागत केले. या वेळी एअर इंडियाचे कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘गोल्डन गर्ल’ गोव्यात आली. भक्ती सध्या एअर इंडियाकडून प्रतिनिधित्व करीत असली तरी ती राज्यासाठी गौरवास्पद बाब आहे. 

जयपूर येथे राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत भक्तीने आपल्यापेक्षा वरचढ खेळाडूंचा पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले. गोव्याला ९ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके जिंकून देणाºया भक्तीने यापूर्वी राष्ट्रीय वरिष्ठ महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली नव्हती. त्यामुळे ही स्पर्धा जिंकण्याचे तिचे स्वप्न होते. जयपूरमध्ये तिची ही स्वप्नपूर्ती झाली. राष्ट्रीय ज्युनियर पातळीवर भक्तीने दोन वेळा राज्याला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिला भारत सरकारची राष्ट्रीय क्रीडानैपुण्य शिष्यवृत्तीही मिळाली आहे. राज्याचा प्रतिष्ठेचा दिलीप सरदेसाई पुरस्कारही भक्तीला मिळाला आहे. अशा गुणवान खेळाडूच्या कामगिरीकडे सरकारने केलेले दुर्लक्ष म्हणजे एक प्रकारची अवहेलनाच आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Goa Sports Department forgot to welcome chess star Bhakti Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.