दोन्ही संघांचे लक्ष्य विजयपथ
By admin | Published: April 22, 2016 02:38 AM2016-04-22T02:38:13+5:302016-04-22T02:38:13+5:30
भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू व कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन्ही संघांनी गेल्या
बंगळुुरू : भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू व कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन्ही संघांनी गेल्या तीन सामन्यांतील दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे संघाची गाडी पुन्हा विजयपथावर आणण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी हा सामना होत आहे. पुणे व बेंगळुरू दोन्ही संघांची सुरुवात निराशाजनक राहिली आहे. पुणे तीन सामन्यांत दोन विजय व एका पराभवासह गुणतालिकेत पाचव्या स्थानी असून, बेंगळुरू सहाव्या स्थानी आहे.
बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली सध्या बहरात असला तरी, त्यांचे प्रमुख खेळाडू प्रभावी कामगिरी करू शकलेले नाहीत. मुंबईविरुद्धच्या सामन्यात १७० धावांची खेळी उभारूनही संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे गोलंदाजांना या सामन्यात खूप मेहनत घ्यावी लागेल.
दुसरीकडे पुणे संघाकडे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, अजिंक्य रहाणे, फाफ डू प्लेसिस, केविन पीटरसन व स्टीवन स्मिथ यासारखे तगडे फलंदाज आहेत. याशिवाय फिरकीपटू रविचंद्रन आश्विन, मुरूगन आश्विन, जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा अशी गोलंदाजांची उत्तम फळी आहे.
बेंगळुरूकडे देखील कोहलीसह, एबी डिव्हिलियर्स, सरफराज खान यासारखे फलंदाज, वॉट्सन, यजुवेंद्र चहल, परवेज रसूल असे गोलंदाज आहेत. या सामन्यात धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलची अनुपस्थिती जाणवेल. विराटने गेल्या दोन सामन्यांत अर्धशतकी खेळी करून फलंदाजीतील धडाका कायम ठेवला आहे. त्याच्या नावावर ६२.३३च्या सरासरीने तीन सामन्यांत १८७ धावा केल्या असून, यंदाच्या मोसमातील ही तिसरी मोठी धावसंख्या आहे. डिविलियर्सच्या नावावर ५५.३३ सरासरीने १६६ धावा आहेत. वॉट्सनने ४ बळी घेण्याबरोबरच फलंदाजीतही उपयुक्तता सिद्ध केली आहे. गेल्या सामन्यात इकबाल अब्दुल्लाने ३ बळी घेतले होते. या सामन्यातही इकबालवरच गोलंदाजीची धुरा असेल. पुणे संघाकडे फाफ डू प्लेसिस, अजिंक्य रहाणे, केविन पीटरसन व स्टीव्ह स्मिथ यांच्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. प्लेसिसने ३ सामन्यांत ५६.६६च्या सरासरीने १७० धावा फटकावल्या आहेत. रहाणेच्या नावावर नाबाद अर्धशतकी खेळीसह ९६ धावा आहेत. पीटरसनच्या नावावर ७३ धावा आहेत. पुण्याची गोलंदाजी भक्कम मानली जाते. मुरूगन आश्विन याने ३ सामन्यांत ६ बळी घेतले असून, गुणतालिकेत तो अव्वल स्थानी आहे. त्याशिवाय ईशांत शर्माने ३ व मार्श याने २ बळी टिपले आहेत. दोन्ही संघांना पुन्हा लय मिळविण्यासाठी सामन्यात विजय आवश्यक आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
> रायझिंग पुणे सुपरजायंट्स महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श, फाफ डू प्लेसीस, ईशांत शर्मा, केविन पीटरसन, इरफान पठाण, रुद्र प्रतापसिंग, रजत भाटिया, अंकित शर्मा, बाबा अपराजित, मुरुगन आश्विन, स्कॉट बोलँड, अंकुश ब्यास, अशोक डिंडा, जसकरम सिंग, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, पीटर हँडस्कॉब व अॅडम झम्पा.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विराट कोहली (कर्णधार), शेन वॉटसन, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, मिचेल स्टार्क, डेव्हिड वीस, श्रीनाथ अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अॅरॉन, केदार जाधव, मनदीपसिंग, सर्फराझ खान, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, अबू नेचीम, सचिन बेबी, यजुवेंद्र चहल, सॅम्युअल बद्री, प्रवीण दुबे, इक्बाल अब्दुल्ला, विक्रमजित मलिक, अॅडम मिल्ने, परवेझ रसूल, लोकेश राहुल, विकास टोकस व केन रिचर्डसन.