चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदक पटकावण्याचे लक्ष्य
By admin | Published: June 1, 2016 03:31 AM2016-06-01T03:31:59+5:302016-06-01T03:31:59+5:30
लंडनमध्ये आयोजित एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अव्वल तीनमध्ये स्थान मिळविण्याचे लक्ष्य असल्याचे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमेन्स यांनी सांगितले
बंगळुरू : लंडनमध्ये आयोजित एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अव्वल तीनमध्ये स्थान मिळविण्याचे लक्ष्य असल्याचे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमेन्स यांनी सांगितले. आम्ही लौकिकाला साजेशी कामगिरी केली, तर चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पदक पटकावण्याची चांगली संधी आहे, असेही ते म्हणाले.
ओल्टमेन्स यांनी सांगितले, की आम्ही बाद फेरीत चांगले खेळतो, याची सर्वांना कल्पना आहे; पण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा या वेळी थोडी वेगळी आहे. अंतिम फेरीत खेळण्यासाठी अव्वल दोनमध्ये, तर कांस्यपदकासाठी खेळण्यासाठी अव्वल चारमध्ये स्थान मिळविणे आवश्यक आहे. आमचे खेळाडू आव्हानाला कसे सामोरे जातात, याची उत्सुकता आहे. आघाडीच्या ३ संघांमध्ये स्थान मिळविण्याची आम्हाला आशा आहे.
भारतीय संघाला या स्पर्धेत १० जून रोजी सलामी लढतीत विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
ओल्टमेन्स म्हणाले, ‘‘संघाचे यश बचावफळीच्या कामगिरीवर अवलंबून आहे. अशी वेळ येते, की सामना जिंकण्यासाठी तुम्ही खूप गोल करू शकत नाही; पण प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्यापासून रोखणे शक्य असते. जर्मन संघाचा बचाव चांगला आहे, तर आॅस्ट्रेलियाचा बचाव अन्य संघांच्या तुलनेत अपारंपरिक असतो. अर्जेंटिना संघ अनुकूल निकालासाठी बचावावर अवलंबून असतो. याच्या जोरावर त्यांनी विश्वकप स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. आमच्या पूर्ण संघाला बचावावर मेहनत घेणे गरजेचे आहे. आमच्या आघाडीच्या फळीतील काही खेळाडूंचा बचावही चांगला आहे. (वृत्तसंस्था)