ज्युदोत ऑलिम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय - तन्वीन तांबोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 09:05 PM2019-01-21T21:05:48+5:302019-01-21T21:18:44+5:30

तन्वीन हिने पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया महोत्सवातील ज्युदोत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

The goal of representing the country for the Judo in Olympics - Tanveen Tamboli | ज्युदोत ऑलिम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय - तन्वीन तांबोळी

ज्युदोत ऑलिम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय - तन्वीन तांबोळी

googlenewsNext

पुणे : ज्युदोसारख्या खेळात करिअर करण्यास सुरुवात केल्यानंतर आमच्या समाजातील काही लोकांना आश्चर्य वाटले, थोडासा विरोधही झाला. मात्र आता विविध स्पर्धांमध्ये पदक मिळविल्यानंतर माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतो. ऑलिपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे, असे महाराष्ट्राची ज्युदोपटू तन्वीन तांबोळी हिने सांगितले.
तन्वीन हिने पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया महोत्सवातील ज्युदोत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. २१ वर्षाखालील वयोगटात तिने ७० किलोखालील विभागात हे यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. तन्वीन ही मूळची विटा येथील खेळाडू आहे. तिची आई जस्मीन शिक्षिका असून वडील रफीक हे विटा नगरपालिकेत नोकरी करतात.
ज्युदो करिअरविषयी तन्वीन म्हणाली, २०१२ मध्ये पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतर्फे घेण्यात आलेल्या शारीरिक कसोटी चाचणीद्वारे माझी निवड झाली. सुरुवातीला मी विविध खेळांचा सराव करीत असे. माझी तंदुरुस्ती व क्षमता पाहून ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू राजीव देव यांनी मला ज्युदोवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला योग्य मानून मी ज्युदोचा सराव सुरू केला. मधुश्री काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली माझा नियमित सराव सुरू आहे. खेलो इंडिया महोत्सवात अंतिम फेरी गाठल्यानंतर माझ्यावर थोडेसे दडपण होते. तथापि काशिद मॅडमनी मला संयमाने व आत्मविश्वासाने खेळण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी खेळले व सोनेरी कामगिरीचे स्वप्न साकार करू शकले.
माझ्या ज्युदो करिअरसाठी मला आईवडिलांचे सतत प्रोत्साहन मिळत असते. मी दररोज येथील अकादमीत सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास सराव करते. खेळाची कारकीर्द सुरू असतानाच मी एकीकडे जोग महाविद्याालयात द्वितीय वर्ष कॉमर्समध्ये शिकत आहे. तेथे मला सतत चांगले सहकार्य मिळत असते. माज्या यशाचे त्यांच्याकडून कौतुकही होत असते. यंदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आहे. त्यासाठी लवकरच राष्ट्रीय निवड चाचणी शिबिर होणार आहे. या चाचणीत सर्वोच्च कामगिरी करीत आशियाई स्पर्धेत देशाकडून खेळण्यासाठी मी उत्सुक झाले आहे, असेही तन्वीन हिने सांगितले.

Web Title: The goal of representing the country for the Judo in Olympics - Tanveen Tamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.