सर्वोत्तम क्षमतेसह आॅलिम्पिक पदक जिंकण्याचे लक्ष्य : दुती चंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 11:26 PM2018-09-15T23:26:29+5:302018-09-15T23:26:49+5:30
दुती चंद आॅलिम्पिक पदक जिंकण्याच्या एकमेव लक्ष्यासह सरावात व्यस्त
नवी दिल्ली : जकार्ता येथील आशियाई स्पर्धेत १०० मीटर आणि २०० मीटर अशा दोन्ही स्पर्धांमध्ये रौप्यपदकविजेती नवी ‘धावसम्राज्ञी’ दुती चंद आॅलिम्पिक पदक जिंकण्याच्या एकमेव लक्ष्यासह सरावात व्यस्त आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आफ्रिकेच्या धावपटूंचे अवघड आव्हान असेल, असे स्पष्ट करून ‘टूर डी कलिंगा’ची ब्रँड दूत दुती म्हणाली, ‘‘आॅलिम्पिकमध्ये आफ्रिकेतील धावपटूंशी स्पर्धा असली, तरी त्याचा फरक पडत नाही. विविध देशानुसार शारीरिक क्षमता व्यक्तीमध्ये असतात. माझ्यातील सर्वोत्तम क्षमतेचा वापर करून पदकाच्या ईर्षेने धावणे, हीच माझी जबाबदारी असेल. आशियाडमध्ये १०० मीटर शर्यतीत ११.३२ सेकंद वेळ नोंदविली. आॅलिम्पिकसाठी ११.१० सेकंद ही वेळ गाठण्याची गरज असेल.
‘‘मी कधीही हार मानणारी नाही. बालपणापासून आव्हानांचा सामना करीत आले; पण परिस्थितीशी झगडून प्रशिक्षणावर लक्ष देते. यामुळेच मला पाठोपाठ यश मिळत आहे. आशियाडमध्ये बहरिनची धावपटू एडिडियोंग ओडियांगला आव्हान दिल्याचा मला आनंद आहे.ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी आशियाई पदकानंतर पुढील मोहिमांसाठी सर्वतोपरी आर्थिक साह्याचे आश्वासन दिले. आतापर्यंत मी कधीही परदेशात प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र, आॅलिम्पिकसाठी परदेशात प्रशिक्षण गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय पदके मिळविणाऱ्या देशातील अव्वल धावपटूंनी परदेशात प्रशिक्षण घेतले आहे.’’
शरीरात पुरुष संप्रेरके असल्याचे कारण देत आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने धावपटू दुतीवर काही वर्षांपूर्वी बंदी घातली होती. आंतरराष्टÑीय क्रीडा लवाद न्यायालयापुढे तिने दाद मागितली. संघर्षमय लढ्यानंतर दुतीला निर्दोष ठरविण्यात आले. दुती सध्या भुवनेश्वर येथील कलिंगा महाविद्यालयात एलएलबीच्या अखेरच्या वर्षाला आहे. स्पर्धा आणि सराव यांमुळे अभ्यासाला वेळ कमी पडतो, असे दुतीने सांगितले.
दुती म्हणाली, ‘‘आधी क्रिकेटशिवाय काही प्रमाणात फुटबॉल आणि हॉकीला महत्त्व दिले जात होते; पण गेल्या काही वर्षांत खेळाकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन बदलला. आशियाडमधील पदकांमुळे अन्य खेळांकडेदेखील सन्मानाने पाहिले जात आहे. अॅथलिटदेखील देशाची शान वाढवू शकतात, ही बाब माझ्या पदकांमुळे स्पष्ट झाली आहे,’’ (वृत्तसंस्था)