गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताचे नेतृत्व
By Admin | Published: September 3, 2016 12:44 AM2016-09-03T00:44:04+5:302016-09-03T00:44:04+5:30
येथील अंधेरी क्रीडा संकुलामध्ये शनिवारी प्यूृर्टो रिको देशाविरुद्ध होणाऱ्या एकमेव आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यासाठी गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताची धुरा सोपविण्यात
मुंबई : येथील अंधेरी क्रीडा संकुलामध्ये शनिवारी प्यूृर्टो रिको देशाविरुद्ध होणाऱ्या एकमेव आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यासाठी गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताची धुरा सोपविण्यात आली. राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्सटेनटाइन शुक्रवारी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.
कॉन्सटेनटाइन यांनी यावेळी सांगितले की, ‘‘या मैत्रीसामन्यासाठी गुरप्रीत भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल.’’ २४ वर्षीय गुरप्रीतसाठी कर्णधार म्हणून मोठा सन्मान मिळाला आहे. विशेष म्हणजे यासह भारतीय संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होईल. त्याने नॉर्वे देशाच्या स्टाबीक एफसीकडून खेळताना गुरप्रीतने युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारा पहिला भारतीय असा लौकिक मिळवला आहे.
हुकमी सुनिल छेत्रीच्या जागी गुरप्रीतची कर्णधारपदी निवड झाली असल्याने, अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉलला या सामन्यात बाहेर असणार हे निश्चित आहे. नुकताच पॉलला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुसरीकडे, १९५५ सालानंतर पहिल्यांदाच मुंबइत आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना होत आहे. त्यावेळी मुंबईत भारत विरुद्ध सोवियत संघ यांच्यात सामना झाला होता. प्यूर्टो रिको संघाविरुध्द बाजी मारल्यास भारत जागतिक क्रमवारीत नक्कीच आपले स्थान सुधारु शकतो. सध्या भारत १५२व्या स्थानी असून प्यूर्टो रिको ११४व्या स्थानी विराजमान आहे.
शुक्रवारी संध्याकाळी प्यूर्टो रिको संघाचे भारतात आगमन झाले असून याचा भारताला फायदा होणार नसल्याचे प्रशिक्षकांंनी सांगितले. कॉन्सटेनटाइन म्हणाले की, ‘‘त्यांच्याकडे काही शानदार खेळाडू आहेत. हा मुंबईत स्थिरावण्यास त्यांना नक्कीच कमी वेळ मिळेल. पण, तरीही यामुळे त्यांची क्षमता कमी होणार नाही.’’ (क्रीडा प्रतिनिधी)