गोलरक्षक श्रीजेश पाच महिने मैदानाबाहेर
By admin | Published: June 28, 2017 12:43 AM2017-06-28T00:43:57+5:302017-06-28T00:43:57+5:30
राष्ट्रीय हॉकी संघाचा नंबर वन गोलकिपर आणि माजी कर्णधार पी.आर. श्रीजेश गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे पाच महिने मैदानाबाहेर राहणार आहे.
नवी दिल्ली: राष्ट्रीय हॉकी संघाचा नंबर वन गोलकिपर आणि माजी कर्णधार पी.आर. श्रीजेश गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे पाच महिने मैदानाबाहेर राहणार आहे. यामुळे तो आॅक्टोबरमध्ये ढाका येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले.
नुकत्याच झालेल्या विश्व हॉकी लीगच्या उपांत्य फेरीदरम्यान भारताला श्रीजेशची उणीव जाणवली. त्याच्या उजव्या गुडघ्यावर याच महिन्यात मुंबईत शस्त्रक्रिया पार पडली. एप्रिल-मे मध्ये झालेल्या अझलन शाह चषक स्पर्धेत तो जखमी झाला होता.
हॉकी इंडियाचे हायपरफॉर्मन्स संचालक डेव्हिड जॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीजेशला तंदुरुस्त होऊन परतण्यास किमान पाच महिने लागतील. अर्थात तो डिसेंबरमध्ये भुवनेश्वर येथे आयोजित विश्वचषक हॉकी लीग खेळू शकेल. जॉन म्हणाले, ‘श्रीजेशची उणीव भासते आहे. विकास दहिया आणि आकाश चिटके अद्याप युवा गोलकिपर आहेत. दोघेही जगातील अव्वल गोलकिपरच्या पंक्तीत बसत नाहीत. पुढील सहा महिन्यात आम्हाला गोलकिपरची फळी उभारण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. श्रीजेशवर डॉ. अनंत जोशी यांनी दहा दिवसांआधी शस्त्रक्रिया केली. तो पुढील पाच महिने खेळू शकणार नाही. श्रीजेशच्या अनुपस्थितीत आणखी काही गोलकिपर तयार करण्यावर आम्ही भर देणार आहोत.’ (वृत्तसंस्था)